शेंदूर्णी येथे उद्या ‘नो व्हेईकल डे’सह ‘माझी वसुंधरा शपथ’ कार्यक्रम

शेंदूर्णी प्रतिनिधी । राज्य शासनाच्या निसर्ग बचाव कार्यक्रमा अंतर्गत शेंदूर्णी नगरपंचायतच्या माझी वसुंधरा अभियानास आजपासून प्रारंभ झाला असून माझी वसुंधरा या उपक्रमातंर्गत पर्यावरण व वसुंधरेचे संरक्षण करून शहर व जनतेचे आरोग्य अबाधित ठेवण्याची जबाबदारी प्रत्येक कुटुंबाचा एक भाग आहे. माझी वसुंधरा, वृक्ष संवर्धन, हरित क्रांती घडविण्याची व वसुंधरा संरक्षणाची शपथ देण्यात येणार आहे.

तसेच आठवड्यातील दर मंगळवारी नो व्हेईकल डे साजरा करण्यात येणार आहे. पर्यावरण संवर्धन व शाश्वत निसर्ग पूर्वक जीवनपद्धत अंमलबजावणी साठी महाराष्ट्र शासनातर्फे माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे यासाठी नागरीकांनी सहकार्य करावे असे आवाहन शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी केले आहे. पंचमहाभूतांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना करावयाच्या आहेत त्यामध्ये पृथ्वी तत्व अंतर्गत “झाडे लावा झाडे जगवा” सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, ओल्या व सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून कचरा घंटा गाडीतच टाकावा, रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकू नये. ओल्या कचऱ्यापासून घरच्या घरी खत बनवावे, शौचालयाचा नियमित वापर करावा, ५० मायक्रोन पेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर टाळावा. वायू तत्वा अंतर्गत वाहनांचा कमीत कमी वापर करावा आठवड्यातील दर मंगळवार नो व्हेईकल डे म्हणून साजरा करावा.

तसेच चार्जिंग वरील गाड्यांचा व सायकलचा वापर करून वायू प्रदूषणाला आळा घालावा. जल तत्वा अंतर्गत पाणी आडवा पाणी जिरवा,जल स्रोतामध्ये घाण कचरा टाकू नये.सांडपाणी उघड्यावर सोडू नये. अग्नी तत्वा अंतर्गत सौरदिवे, सौर हिटर व सौर ऊर्जेवर चालणाऱ्या बाबींचा वापर करावा, विजेचा अनावश्यक वापर टाळावा. आकाश तत्वा अंतर्गत हरित सेनेची नोंदणी करून शपथ ग्रहण करणे व पर्यावरण सांभाळणे विषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचे शेंदूर्णी नगरपंचायत मुख्याधिकारी साजिद पिंजारी यांनी कळविले आहे.

 

Protected Content