निरामय आरोग्यासाठी करियर व आरोग्य यांचा बॅलेन्स राखणे गरजेचे – डॉ. बेंडाळे

जळगाव, प्रतिनिधी ।  आजची स्त्री ही करियर आणि कुटुंब अशी दुहेरी भूमिका निभावते आहे, स्पर्धेच्या  युगात स्व:ताला अपडेट ठेवण्यासाठी ती कसोशीने झटते आहे. मात्र या धावपळीचा परिणाम म्हणजे विविध आजारांचे वाढलेले प्रमाण होय. याला वेळीच थोपविता यावे यासाठी महिलांनी करियर आणि आरोग्य याचा योग्य बॅलन्स राखणे गरजेचे आहे, असे मत स्त्रीरोगतज्ञ डॉ. रुपाली बेंडाळे यांनी मांडले. के. सी.ई  सोसायटीचे  अमृतमहोत्सवी वर्ष तसेच जागतिक महिलादिनानिमित्त  “आधुनिक तंत्रज्ञान आणि स्त्री रोग चिकित्सा” या विषयावर मू. जे. महाविद्यालयातील नवा कॉन्फरन्स हॉल येथे या विशेष व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्या बोलत होत्या.

“आधुनिक तंत्रज्ञान आणि स्त्री रोग चिकित्सा” या विषयावरील व्याख्यानाप्रसंगी लाईफ सायन्सच्या संचालिका प्रा. डॉ. गौरी राणे, सोहम आणि योग विभागाच्या संचालिका प्रा. डॉ. आरती गोरे, मदर टेरेसा हेल्थ  केअर सेंटरच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना चौधरी आदी उपास्थित होते. डॉ. रुपाली बेंडाळे यांनी पुढे सांगितले की,  मासिक पाळीचे विकार, स्त्री वंधत्व, स्तनाचा आणि गर्भाशयाचा कॅन्सर यावर असलेला  प्रभावी उपचार तसेच योग्य आहाराचे महत्वही त्यांनी पटवून  दिले. किरकोळ शारीरिक दुखापतीकडे महिला दुर्लक्ष करतात आणि यातून मोठे आजार कधी डोके वर काढतात हे लक्षात येत नाही. यासाठी सहा महिन्यातून एकदा शारीरिक तपासणी करून घ्यावी, स्त्री ही कुटुंबाचा आधार असते “स्त्री सुदृढ तर कुटुंब सुदृढ” हा मूलमंत्र प्रत्येकाने लक्षात घेतला पाहिजे असा मोलाचा सल्लाही त्यांनी दिला. अध्यक्षीय मनोगत प्रा. डॉ. गौरी राणे व्यक्त केले. सुत्रसंचालन व आभार डॉ. लीना चौधरी यांनी केले. या कार्यक्रमाला महिलावर्गाचा उस्फुर्त प्रतिसाद लाभला.  यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कामकाज पहिले.

Protected Content