नियंत्रण रेषेवरील गोळीबार थांबवण्याची भारत , पाकची तयारी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । भारत आणि पाकिस्तानमध्ये अत्यंत महत्वाचा करार झाला असून दोन्ही देशाच्या लष्करांनी जम्मू आणि काश्मीरमधील तसंच इतर परिसरातील नियंत्रण रेषेवर गोळीबार थांबवण्यावर सहमती झाल्याची घोषणा केली आहे.

 

भारत आणि पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टर जनरलकडून संयुक्त निवेदन प्रसिद्ध करण्यात आलं आहे. दोन्ही देशांकडून २००३ मध्ये झालेल्या युद्धविरामाच्या कराराचं पालन केलं जाणार आहे. या करारामुळे भारत-पाकिस्तानमध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु असलेला तणाव कमी होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

यामध्ये देण्यात आलेल्या माहितीनुसार, दोन्ही अधिकारी टेलिफोन हॉटलाइनच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. यावेळी कोणताही गैरसमज दूर करण्यासाठी तसंच तोडगा काढण्यासाठी फ्लॅग मीटिंग किंवा हॉटलाइन सुविधा यंत्रणेचा उपयोग करण्याबाबत दोन्ही बाजूंनी एकमत झाल्याचं लष्कराने सांगितलं आहे.

 

“भारत आणि पाकिस्तानच्या मिलिटरी ऑपरेशन्स डायरेक्टर जनरलमध्ये हॉटलाइनच्या मार्फत चर्चा पार पडली. दोन्ही देशांनी नियंत्रण रेषेवरील तसंच इतर ठिकाणच्या परिस्थितीचा आढावा घेतला,” अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे. दोन्ही देशाच्या अधिकाऱ्यांनी शांतता भंग करत हिंसाचारास बळ देणाऱ्या महत्वाच्या मुद्द्यांवर शांततेच्या मार्गाने चर्चा करण्यावरही एकमत दर्शवलं आहे.

 

“दोन्ही बाजूंनी नियंत्रण रेषा आणि इतर सर्व क्षेत्रातील करारांचं पालन करण्यावर तसंच समजूतदारपण दर्शवण्यावर आणि गोळीबार थांबविण्यास सहमती दर्शवली आहे. २४/२५ फेब्रुवारी २०२१ रोजी मध्यरात्रीपासून याची अमलबजावणी होईल,” अशी माहिती निवेदनात देण्यात आली आहे.

Protected Content