मुंबई : वृत्तसंस्था । महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घ्यावा आणि निधी वाटपात कॉंग्रेसच्या विभागांवर होत असलेला अन्याय दूर करावा अशा मागण्या महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या.
कॉंग्रेस-यूपीएच्या अंतर्गत विषयांवर शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या विधानांबद्दल नाराजीही व्यक्त करण्यात आली महाविकास आघाडी सरकारची प्रतिमा सावरण्याची गरजही व्यक्त करण्यात आल्याचे समजते.
पोलीस अधिकारी सचिन वाझे आणि परमबीरसिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे महाविकास आघाडीची व कॉंग्रेसची प्रतिमा मलिन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसच्या नेत्यांनी प्रभारी एच. के. पाटील यांच्यासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षां निवासस्थानी भेट घेतली. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचा शिष्टमंडळात समावेश होता. राज्यातील विद्यमान राजकीय परिस्थितीबाबत व किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणी संदर्भातही चर्चा झाल्याचे प्रभारी एच. के. पाटील यांनी सांगितले.