नितीन राऊत म्हणतात मग नोटांवर आंबेडकरांची प्रतिमा का नको ? 

 

नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | चलनी नोटांवर लक्ष्मी आणि श्रीगणेशाच्या प्रतिमा हव्यात अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केल्यानंतर यावरून विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे एक वेगळी मागणी केली. ते म्हणाले की, भारताच्या चलनी नोटांवर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची प्रतिमा असून याच्या जोडीला श्रीगणेश आणि लक्ष्मी यांच्या प्रतिमा देखील हव्यात. यामुळे देशात सुख, समृध्दी व सुबत्ता येणार असल्याचा दावा त्यांनी केला.

केजरीवाल यांच्या मागणीवर भाजपने टीका केली आहे. पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा म्हणाले की, केजरीवाल हे हिंदूविरोधी असून याचे अनेक पुरावे इंटरनेटवर आहेत. मात्र आता त्यांनी अचानक यु-टर्न घेण्याचे कारण काय ? अशी विचारणा त्यांनी केली आहे. तर, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देखील या मागणीवर टीका केली आहे. माजी मंत्री तथा कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते नितीन राऊत यांनी तर ट्विट करून नोटांवर महात्मा गांधी यांच्या सोबतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो का नको ? असा सवाल देखील विचारला आहे. यामुळे आता या मुद्यावरून वाद-प्रतिवाद होत असल्याचे दिसून आले आहे.

Protected Content