सुरू झाली चर्चा : दिल्लीत उन्मेश…तर मुंबईत मंगेश !

unmesh patil mangesh chavan

चाळीसगाव दिलीप घोरपडे । लोकसभेत विक्रमी बहुमताने दाखल झालेल्या उन्मेश पाटील यांच्या रिक्त झालेल्या आमदारकीच्या जागेवर त्यांचे जीवश्‍चकंठश्‍च मित्र मंगेश चव्हाण यांना संधी मिळण्याचे स्पष्ट संकेत आता मिळाले आहेत. यामुळे मतदारसंघामध्ये आता ”दिल्लीत उन्मेश…तर मुंबईत मंगेश !” अशी चर्चा रंगू लागली आहे.

पोटनिवडणूक नाहीच

चाळीसगावचे सुपुत्र आमदार उन्मेशदादा पाटील यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत दणदणीत विजय संपादन करत लोकसभा गाठली आहे. अर्थात, आता त्यांच्या आमदारकीच्या रिक्त झालेल्या जागी त्यांचे जिगरी दोस्त मंगेश चव्हाण यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. आगामी सहा महिन्यांच्या आता विधानसभा निवडणूक होणार आहे. यामुळे पोटनिवडणूक न होता, विधानसभेच्या निवडणुकीसोबतच चाळीसगावच्या जागेसाठी मतदान होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

अडचणींची शक्यता धुसर

खरं तर, उन्मेशदादा पाटील हे दिल्लीत गेल्यानंतर त्यांच्या जागेवर आमदारकीचे तिकिट मिळण्यासाठी अनेक मान्यवर इच्छुक आहेत. तथापि, त्यांचे मित्र युवा उद्योजक मंगेश चव्हाण यांना ही संधी मिळण्याची शक्यता सर्वाधीक आहे. याचे सुतोवाच आधीच करण्यात आलेले आहे. मंगेश चव्हाणांनी आपल्या गेल्या वाढदिवसाला शहरात स्वखर्चातून सीसीटिव्ही लाऊन दिले. तसेच ते आधीपासूनच सामाजिक जीवनात सक्रीय आहेत. याच्या जोडीला खासदार उन्मेशदादांची संपूर्ण राजकीय शक्ती त्यांच्या पाठीशी असल्यानंतर कोणतीही अडचण येणार नसल्याची बाब उघड आहे.

…तर मणिकांचन योग !

खासदार उन्मेशदादा पाटील यांच्या जोडीला आमदारकीला त्यांचेच मित्र मंगेश चव्हाण आल्यास शहरासह तालुक्याच्या विकासाचे एक नवीन पर्व सुरू होण्याची शक्यता आहे. खरं तर, हा एक मणिकांचन योगच बनण्याची शक्यता आहे. यामुळे आता दिल्लीत उन्मेश…तर मुंबईत मंगेश अशी चर्चा चाळीसगाव तालुक्यात सुरू झाली आहे. अर्थात, आगामी राजकीय स्थितीचे यातून एक चित्र उभे राहत असल्याचेही दिसून येत आहे. याबाबत दस्तुरखुद्द उन्मेशदादा अथवा मंगेश चव्हाण यांनी काहीही भाष्य केलेले नाही. तथापि, सूत्रांच्या माहितीनुसार सर्वांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे सध्या सुरू असणार्‍या चर्चेवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Add Comment

Protected Content