नागरिकांनी मदत करताना स्वत:चीही काळजी घ्यावी ; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

जळगाव  (प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. सध्या जिल्ह्यातून स्थलांतरित मजूर जात आहेत. या मजुरांना मोठ्या प्रमाणात नागरिक, स्वयंसेवी संस्था मदत करीत आहेत. ही कौतुकाची व अभिनंदनीय बाब आहे. कोरोना विषाणूचे संक्रमण पाहता मदतकर्ते नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

पालकमंत्री पाटील यांनी म्हटले आहे, जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 235 नागरिकांना आतापर्यंत कोरोना विषाणूची बाधा झाली आहे, तर अठ्ठावीस जणांना कोरोना विषाणूमुळे आपला जीव गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक नागरिकाने आपली काळजी घेणे आवश्यक आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यात 17 मे 2020 पर्यंत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे.
स्थलांतरित मजुरांच्या मदतीसाठी अनेक दानशूर नागरिक, स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. अशा व्यक्तींचे कार्य गौरवास्पद आहे. नागरिक, संस्था या मजुरांना पाणी, भोजन, औषधे आदींची मदत करीत आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाला सहकार्य होत आहे. मात्र, असे नागरिक व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनीही मदत कार्य करताना कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होणार नाही याची दक्षता घेतली पाहिजे, असेही पालकमंत्री श्री. पाटील यांनी म्हटले आहे.

सामाजिक संस्थांना पालकमंत्र्यांचे आवाहन

स्थलांतरित मजुरांसाठी अनेक दानशूर नागरिक, स्वयंसेवी संस्था पुढे आल्या असून त्या या मजूरांना जिल्ह्याच्या विविध ठिकाणी मदतकेंद्र उभारुन मदत करीत आहे की कौतूकाची बाब आहे. असे असले तरी अनेक सामाजिक संस्थांनी मदत केंद्र हे राष्ट्रीय महामार्गालगत उभारले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. तसेच या मजूरांबरोबर त्यांचे कुटूंब लहान मुले असतात ही बाबत लक्षात घेऊन मदत केंद्र उभारताना, शहरातील नागरीकांना तसेच वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी. या संस्थांनी मदतकेंद्र उभारताना ते शक्यतो शहराबाहेर उभारावेत. जेणेकरुन स्थलांतरीत मजूरांना गाडीतून उतरल्यानंतर जेवण व पाण्यासाठी मोकळी जागा उपलब्ध होईल. त्याचबरोबर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी स्थलांतरीत मजूरांची गर्दी होऊन वाहतुकीसही अडथळाही निर्माण होणार नाही. त्याचबरोबर शहरातील नागरीकांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण होणार नाही असे आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

जळगाव जिल्ह्यातील नागरिकांना माझी विनंती आहे, की त्यांनी घरीच राहून सुरक्षित राहावे. नागरिकांनी अनावश्यक गर्दी टाळावी. अत्यावश्यक काम असेल, तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे. अशा वेळेस नागरिकांनी चेहऱ्यावर मास्क लावला पाहिजे. तसेच दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील याची काळजी घेतली पाहिजे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्हावासियांनी घरीच थांबून जिल्हा प्रशासनाला सहकार्य करावे, असेही आवाहन पालकमंत्री श्री. पाटील यांनी केले आहे.

Protected Content