जळगाव, प्रतिनिधी | गणेश कॉलनी येथे के.सी. ई. सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात एका प्लॉट धारकाने रात्री १२ वाजता अचानक वहिवाटीचा रस्ता बंद केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर महापालिकेतर्फे याची चौकशी करून ही भिंत पाडण्यात आली.
सोमवार दि. २२ नोव्हेंबर रोजी रात्री १२ वाजेनंतर के.सी. ई. सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेज रस्त्यावर एका प्लॉटधारकाने वहिवाटसाठी रस्ता बंद केल्याने इतर नगरीक आक्रमक झाले होते. यासंदर्भात त्यांनी आ. राजूमामा भोळे व नगरसेविका दीपमाला काळे यांच्याकडे सकाळीच आपली व्यथा मांडली. यावेळी महापालिकेतर्फे याची चौकशी करून अतिक्रमण पथकाच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्यात आला.
२३६/ड या ले आउटमध्ये प्लॉट बाबत वाद निर्माण झाला असता हा वाद न्यायालयात गेला असून उच्च न्यायालयानेही हा रस्ता वहिवाटीचा असल्या कारणाने हा रस्ता कायम ठेवण्यात यावा असे आदेश दिलेले आहेत. मात्र, महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांना तात्पुरती परवानगी संबधित जागा मालकास दिली. यामुळे रात्रीच कंपाऊंड वाॅल तयार करून हा रस्ता बंद करण्यात आला होता. याबाबत माहिती कळताच आमदार राजूमामा भोळे व नगरसेविका दीपमाला काळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. नगरसेविका दीपमाला काळे यांनी याबाबतची अधिकची माहिती महापालिकेतून घेतली असता या कामास तात्पुरती परवानगी दिली असल्याची बाब उघड झाली. तत्कालीन नगररचनाकार निकम यांनी सेक्शन ५१ अंतर्गत ही तात्पुरती परवानगी रद्द करण्यात येईल असे स्पष्ट केले होते.यानुसार हे अतिक्रमण काढण्यात आले आहे. प्लॉट बाबत वाद असल्याने अधिकाऱ्यांना हाताशी घेत हा रस्ता बंद करण्यात आल्याचा आरोप मनोज काळे यांनी केला आहे. तर प्लॉट धारकांना महापालिकेने नोटीस देवून मोजणी करणे गरजेचे होते. असे बेकायदेशीरपणे रस्ता बंद करणे चुकीचे आहे. महापालिकेचे शहनिशा करून याबाबत परवानगी द्यायला हवी असे मत आ. राजूमामा भोळे व्यक्त केले. महापालिकेने रस्ता मोकळा केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.