चेन्नई: वृत्तसंस्था । मक्कल निधी मय्यमचे प्रमुख कमल हासन यांनी नव्या संसद भवनाच्या निर्मितीवर प्रश्न उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
‘चीनच्या महान भिंतीच्या निर्मितीवेळी हजारो लोक मारले गेले. त्या वेळी ही भिंत लोकांच्या रक्षणासाठी आहे असे राजांनी म्हटले. आता कोरोना महासाथीमुळे आपला रोजगार गमावल्यानंतर भारताचा अर्धा भाग उपाशी आहे. असे असताना १००० कोटी रुपये खर्च करून कोण संसद भवन उभारेल? कृपया उत्तर द्यावे, माझे प्रिय पंतप्रधान…’, असे कमल हासन यांनी ट्विट करत म्हटले आहे
एमएनएम प्रमुख कमल हासन हे पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी रविवारी निवडणूक प्रचार सुरू करत आहेत. या पूर्वी त्यांनी ट्विट करत उभे राहत असलेल्या नव्या संसद भवाना निर्मितीवर केंद्र सरकार आणि भारतीय जनता पक्षावर हल्लाबोल केला.
अभिनेत्याचे नेते बनलेले कमल हासन हे १३-१६ डिसेंबरच्या दरम्यान आपल्या पहिल्या टप्प्यातील निवडणूक अभियानाची सुरुवात करत आहेत. चार दिवसांच्या कार्यक्रमाद्वारे कमल हासन मदुराई, थेणी, डिंडीगूल, विरुद्धुनगर, तिरूनलवेली, तूतिकोरीन आणि कन्याकुमारी जिल्ह्याचे दौरे करणार आहेत. हासन यांच्या पक्षाने गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले होते. मात्र त्या निवडणुकीत त्यांना कोणतीही सफलता मिळाली नव्हती.
संसद भवनाची नवी इमारत उभी करण्यासाठी १००० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. नवे संसद भवन टाटा प्रोजेक्ट लिमिटेड बनवत आहे. हे बांधकाम सन २०२२ पर्यंत पूर्ण होणार आहे. ही इमारत तीन मजली असेल. या इमारतीचे बांधकाम भूकंपरोधक असेल. नव्या भवनाच्या निर्मितीदरम्यान वायु आणि ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत.