जळगाव, प्रतिनिधी । Notes पद्धतीने स्त्रीरोग विषयक ऑपरेशन देशात प्रथमच जळगाव शहरातील नवाल हॉस्पिटल येथे करण्यात आले असून त्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडियामध्ये करण्यात आली असल्याची माहिती डॉ. सुयश नवाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सुभाष नवाल उपस्थित होते.
डॉ. सुयश नवाल यांनी पुढे सांगितले की, Notes पद्धतीने स्त्रीरोग विषयक ऑपरेशनची सुरुवात तैवान, बेल्जीयम व कोरिया या देशांमध्ये सुरु झाली होती. या नवीन पद्धतीच्या ऑपरेशनमध्ये पोटावर एकही इजा अथवा चिरा न करता हे ऑपरेशन दुर्बिणीद्वारे करण्यात येतात. या पद्धतीने ऑपरेशन भारतात पहिल्यांदाच करण्यात आले आहे. साधारण दुर्बिणीच्या ऑपरेशनमध्ये किंवा कोणत्याही स्त्रीरोग विषयक ऑपरेशनमध्ये पोटाला चिरा देऊन ऑपरेशन करावं लागत व त्यानंतर टाके घातले जातात. दरम्यान, डॉ. सुयश नवाल हे दिल्ली येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात सहभागी झाले असता त्यांची भेट तैवान येथील डॉक्टरांशी झाली. याचर्चेतून डॉ. नवाल यांनी प्रेरणा घेऊन भारतात प्रथमच २३ मार्च २०१९ रोजी Notes पद्धतीने ऑपरेशन केले. यावेळी त्यांच्या सोबत डॉ. सुदर्शन नवाल, डॉ. ऋचा नवाल, डॉ. जयश्री राणे व नवाल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओ. टी. टीमने हे ऑपरेशनं यशस्वी केले. यात २. ४६५ कि. ग्रॅ. चे ३८ वर्षीय महिलेचं गर्भाशय काढण्यात आले. या नवतंत्रज्ञानांतील कामगिरीमुळे वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे संपादक, पावन सोलंकी यांच्याहस्ते सन्मानपत्र, गोल्डमेडल व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले आहे.