तुळजापूर: वृत्तसंस्था । ‘हे संकट संपूर्ण शेती अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणारं आहे. या संकटावर एकजुटीने मात करू. सध्या दिवस वाईट आहेत, परंतु धीर सोडायचा नाही. सरकार तुमचं आहे,’ अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी मराठवाडयातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्यांना धीर दिला.
अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालेल्या गावांची व पिकांची पाहणी करण्यासाठी शरद पवार मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. आज सकाळपासून त्यांनी अनेक ठिकाणी पाहणी केली. लातूर जिल्ह्यातील राजेगाव येथे त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी प्रत्येक शेतकरी आपलं गार्हाणं त्यांच्याकडं मांडत होता. ‘धीर सोडू नका, आम्ही आहोत,’ असा शब्द पवारांनी या शेतकऱ्यांना दिला.
लातूर जिल्हयातील किल्लारी आणि परिसरात झालेल्या भूकंपाची आठवण त्यांनी यावेळी सांगितली. त्या ठिकाणी पहाटे पोहोचून लोकांना धीर दिला होता. संकटग्रस्त माणसांना उभं केलं होतं. आज तसंच संकट उभं ठाकलं आहे. दुष्काळ आल्यावर पीकं नष्ट होतात परंतु या संकटात जमीनच खरवडून गेली आहे. जमिनीचे स्वरूपच बदलले आहे. हे नुकसान जास्त आहे, असं शरद पवार म्हणाले.
‘लोकांना तातडीची मदत कशी देता येईल. खरवडून गेलेली जमीन कशी सावरता येईल आणि नुकसानीतून बाहेर पडण्यास मदत कशी होईल ही परिस्थिती जाणून घेण्यासाठी आम्ही आलो आहोत. या संकटातून मार्ग काढावा लागेल. यासाठी राज्य व केंद्र सरकारशी बोलू. नुकसानीचे स्वरूप पाहता एकट्या राज्य सरकारची या सगळ्याला तोंड देण्याची परिस्थिती नाही. केंद्राची मदत मिळणं आवश्यक आहे. मुख्यमंत्री आणि देशातील प्रमुख लोकांशी बोलून तातडीची मदत कशी देता येईल, असा प्रयत्न करणार असल्याचं शरद पवार यांनी सांगितलं.