धरणगाव कोविड १९ विशेष विलगीकरण कक्षात असुविधा ; क्वारंटाईन व्यक्तीने मांडली व्यथा

 

धरणगाव,प्रतिनिधी । शहरातील एका कोरोना संशयिताच्या संपर्कातील ११ जणांना खबरदारीचा उपाय म्हणून कोविड १९ विशेष कक्षात विलगीकरण करण्यात आले आहे. मात्र, या कक्षात सुविधांचा अभाव असून कोणत्याही प्रकारची तपासणी किंवा प्राथमिक औषधी देण्यात आल्या नसल्याची व्यथा विलगीकरण करण्यात आलेल्या एका व्यक्तीने ‘लाईव्ह ट्रेंड्स न्यूज’कडे मांडली आहे.

धरणगावातील एका कोरोना संशयिताच्या संपर्कातील ११ जणांना काल सायंकाळपासून कोविड १९ विशेष कक्षात विलगीकरण करण्यात आले आहे. मात्र, येथे त्यांना प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा पुरविल्या जात नसल्याची तक्रार करण्यात येत आहे. विलगीकरण कक्षात या ११ जणांसाठी केवळ एकच शौचालय असून त्या शौचालय अवस्था अत्यंत वाईट असून तेथे स्वच्छता केली जात नाही. शिवाय दुर्गंधी देखील येत आहे. त्यामुळे तेथे स्वतंत्र शौचालयाची मागणी करण्यात येत आहे. तसेच आज दुपारपर्यंत हा कक्ष स्वच्छ करण्यात आलेला नव्हता. याठिकाणी धूळ-माती असल्याचे देखील तक्रारकर्त्याचे म्हणणे आहे. अगदी पिण्याच्या पाण्याची सोय देखील व्यवस्थित नाहीय. दरम्यान, ज्या डॉक्टरने रुग्णावर उपचार केले. ते आजही रुग्णसेवा देत आहेत. मग आम्हालाच विलगीकरण करण्याची घाई का करण्यात आली?. तसेच जर या कक्षात सुविधांचा अभाव होता, तर मग नियमाप्रमाणे रिपोर्ट येईपर्यंत आम्हाला होम क्वारंटाईन का करण्यात आले नाही. संबंधित विभागाने या तक्रारींकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी अपेक्षा तक्रारकर्त्या व्यक्तीने ‘लाइव्ह ट्रेंड्स न्यूज’कडे फोनद्वारे केली आहे.

Protected Content