तलाठ्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी धरणगाव येथील दोघांची निर्दोष मुक्तता

judge hammer

 

जळगाव (प्रतिनिधी) तलाठ्यावर प्राणघातक हल्ल्याप्रकरणी धरणगाव येथील दोघांची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

 

धरणगाव तालुक्यातील फिर्यादी दिपक नवनाथ ठोंबरे, अल्ताफ निजाम पठाण व बालाजी बापुराव लोंढे या तिघां तलाठ्यांची तत्कालीन धरणगाव तहसीलदार यांनी अवैध वाळू उत्खनन, उपसा व वाहतूक रोखण्यासाठी नेमणूक केली होती. त्याकामी, हे तिघेही तलाठी दि. १ जुलै २०१५ रोजी रात्री बारा वाजता ड्युटी करण्यासाठी मोटारसायकल घेऊन धरणगाव तालुक्यातील वाकटुकी या गावी बस स्टॅंडवर थांबलेले होते. यावेळी त्यांना गिरणा नदीकडुन रेतीने भरलेला डंपर (क्र.एम एच-२३-५०९०) येताना दिसला. सदर डंपर थांबवून डंपरच्या ड्रायव्हरकडे वाळु वाहतूकीचा परवाना व रॉयल्टीचे टोकन मागितले असता, ड्रायव्हर प्रविण भास्कर चौधरीने नाही म्हणून सांगितले. त्यामुळे तलाठी दिपक ठोंबरे हे डंपरमध्ये बसले व त्यांनी ड्रायव्हर प्रविण चौधरीला सदर डंपर धरणगाव तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले. तसेच त्यांच्या दोन्ही सहकारी तलाठ्यांना डंपरचे मागे येण्यास सांगितले. डंपर सोनवद गावाच्या पुढे आल्यावर ड्रायव्हर प्रविण भास्कर चौधरी व क्लिनर अजय उर्फ छोटु मुरलीधर गुरव या दोघांनी डंपर थांबवीत तलाठी दिपक ठोंबरे याला खाली उतरण्यास सांगितले. तसेच उतरला नाहीस, तर तुला जिवंत ठवणार नाही, अशी धमकी दिली. तेव्हा तलाठी दिपक ठोंबरे यांनी उतरण्यास नकार देऊन सदर डंपर धरणगाव तहसील कार्यालयात नेण्यास सांगितले. परंतू दोन्ही आरोपींनी त्याला शिविगाळ करुन चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. तर क्लिनर छोटु गुरव याने तलाठी दिपक ठोंबरे याला डंपरमधील लोखंडी रॉडने डोक्यावर मारुन दुखापत करत डंपरमधुन खाली ढकलुन दिले आणि दोघेही जण डंपर घेऊन धरणगावच्या दिशेने पळुन गेले. त्यानंतर तलाठी दिपक ठोंबरेचे ईतर दोन्ही सहकारी तलाठी तेथे आले व त्यांनी जखमी अवस्थेत रस्त्यावर पडलेल्या तलाठी दिपक ठोंबरे यांना उचलले व धरणगाव येथे आणले, अशा आशयाची फिर्याद तलाठी दिपक ठोंबरे यांनी धरणगाव पोलिस स्टेशनला दाखल केली होती. त्यावरुन दोन्ही आरोपींविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३९४, ५०४, ५०६, ३४ व माईन अॅंड मिनरल रेग्युलेशन अॅक्ट कलम २१(अ) व २१(ब) प्रमाणे गुन्हा दाखल होऊन आरोपींना अटक झाली होती.
सदर खटल्याचे चौकशीकामी जळगाव सेशन्स कोर्टात सरकारपक्षातर्फे फिर्यादी तलाठी दिपक ठोंबरे, तलाठी अल्ताफ पठाण, नायब तहसीलदार अनिल चव्हाण, सरकारी पंच, तपासाधिकारी पोलिस निरीक्षक चंद्रकांत बनकर तसेच वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश खेताडे यांचेसह एकुण सात साक्षीदार तपासण्यात आले.साक्षीदारांच्या जबानीतील तफावती, अविश्वासार्हता तसेच तपासकामातील तृटी आदी बाबींचा विचार होउन जळगाव येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश गोविंद सानप यांनी दोन्ही आरोपींची निर्दोष मुक्तता केली. दोन्ही आरोपींतर्फे बचावाचे काम अॅड. वसंत आर ढाके यांनी पाहिले. त्यांना अॅड. प्रसाद व्ही ढाके, अॅड. भारती व्ही ढाके व अॅड. शाम बी जाधव यांनी सहकार्य केले.

Protected Content