मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील वांद्र्यात पोलिसांनी डमी ग्राहक बनून तब्बल 14 कोटी रुपयांचा मास्कसाठा जप्त केल्यामुळे खळबळ उडाली आहे. मुंबईच्या क्राईम ब्राँच युनिट 9 ने ही कारवाई केली आहे. यावेळी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग हे देखील घटनास्थळी उपस्थित होते.
मुंबई क्राईम ब्रांचला काही दिवसांपूर्वी मास्कचा काळाबाजार सुरु असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार, मुंबई क्राईम ब्रांचने आज वरिष्ठ पोलीस अधिकारी महेश देसाई यांनी वांद्रे, अंधेरी, भिवंडी या ठिकाणी सर्च ऑपरेशन केले. यावेळी पोलिसांनी बनावट गिऱ्हाईक बनून मास्कची होलसेल मागणी केली. या आयडियाद्वारे हा मास्कसाठा जप्त करण्यात आला. पोलिसांनी यावेळी २५ लाख मास्क आणि सॅनिटायझर जप्त केले. याची किंमत १४ कोटी रुपये इतकी आहे. यावेळी चार आरोपींना अटक केली असून उर्वरीत दोघांना लवकरच अटक करु, असेही अनिल देशमुख म्हणाले.