अपघातात वाहनाचे नुकसान; खोटे नगर स्टॉपजवळील घटना

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील खोटे नगरजवळील हॉटेल गिरणा समोरील राष्ट्रीय महामार्गावर पुढे जाणाऱ्या वाहनाचा वेग कमी झाला म्हणून ब्रेक दाबला आणि मागील वाहन येऊन मधल्या वाहनावर धडकल्याने त्याचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने यात कोणाला दुखापत झाली नाही. याप्रकरणी शनिवारी २३ सप्टेंबर रोजी  मागून घडक देणाऱ्या वाहन चालकाविरुद्ध जळगाव तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

याबाबत अधिक माहिती अशी की, पारोळा येथील कापड व्यावसायिक निखील जगदीश पाटील (२७) हे शुक्रवारी २२ सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजून ५० मिनीटांनी  त्यांच्या वाहनाने (क्र. एमएच १९, ईए ३२८७)  जळगाव येथून पारोळ्याकडे जात होते. महामार्गावर खोटे नगर थांब्याच्या पुढे एका हॉटेलसमोर पुढे जाणाऱ्या वाहनाचा वेग कमी झाल्याने पाटील यांनीही त्यांच्या वाहनाचा वेग कमी केला व मागून भरधाव येणाऱ्या वाहनाने (क्र. एमएच १८, बीडब्ल्यू ९७८६) धडक दिली. यात पाटील यांच्या वाहनाच्या डिक्कीचे नुकसान झाले. तसेच मागून धडक बसल्याने हे वाहन पुढील वाहनावरही धडल्याने बोनट व हेडलाईटचेदेखील नुकसान झाले. या प्रकरणी निखील पाटील यांनी शनिवारी २३ सप्टेंबर रोजी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जळगाव तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून धडक देणाऱ्या वाहनाचा चालक आपसिंह मांगीलाल धुडवे (रा. नगलवाडी बुजुर्ग, जि. बडवाणी, मध्यप्रदेश) याच्याविरुद्ध जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस नाईक उमेश ठाकूर करीत आहेत.

Protected Content