दोन गावठी पिस्तूल आणि ६ जिवंत काडतूसासह दोन जणांना अटक

चोपडा- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चोपडा तालुक्यातील लासुर हातेड रस्त्यावर गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस सोबत घेवून विक्रीच्या उद्देशाने फिरणाऱ्या दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून २ गावठी पिस्तूल आणि ६ जिवंत काडतूस हस्तगत केली आहे. याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, श्याम नामदेव चव्हाण (वय-२४) समीर सुभान सय्यद (वय-२३) दोन्ही रा. हिरापूर ता. चाळीसगाव हे दोघेजण गावठी पिस्तूल व जिवंत काडतूस खरेदी करून दुसरीकडे विक्रीच्या उद्देशाने दुचाकीवर फिरत होते. ही माहिती चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के.के. पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. सोमवारी १० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास चोपडा तालुक्यातील लासुर हातेड रस्त्यावर दोघांना अडवले. यावेळी त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन गावठी कट्टे आणि ६ जिवंत काडतूस मिळून आले. याबाबत त्यांना विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. दरम्यान पोलिसांनी दोघांना अटक केली असून दोघांजवळून गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतूस हस्तगत केली आहे. या घटनेबाबत पोलीस हेडकॉन्स्टेबल लक्ष्मण शिंगाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी श्याम नामदेव चव्हाण आणि समीर सुभान सय्यद या दोघांवर चोपडा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेबाबत पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उमरसिंग वसावे करीत आहे.

Protected Content