माजी शिक्षणाधिकारी महाजनांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस

जळगाव प्रतिनिधी । माहिती अधिकारात मागितलेली माहिती देण्यास टाळाटाळ केल्याप्रकरणी माध्यमिक विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी डी. पी. महाजन यांच्यावर कारवाईची शिफारस राज्य माहिती आयुक्तांनी दिली आहे.

बामणोद येथील किशोर तुकाराम तळेले यांनी माहिती अधिकारात शिक्षण विभागाकडे २८ नोव्हेंबर २०१६ रोजी माहिती मागितली होती. जिल्हाधिकार्‍यांकडून आदेश होवून शिक्षणविभागाकडे हा अर्ज वर्ग करण्यात आला होता. दरम्यान, १७ डिसेंबर २०१८ पर्यंत ही माहिती तळेले यांना मिळाली नाही. ही बाब सुनावणीसाठी राज्य माहिती आयुक्तांकडे आल्यानंतर शिक्षणाधिकारी डी.पी. महाजन यांनी त्यांची बाजू मांडण्यासाठी खुलासा सादर केला. मात्र यात समाधानकारक कारण देण्यात आलेले नाही.

या बाबीची दखल घेऊन राज्य माहिती आयुक्त के. एल. बिश्‍नोई यांनी डी. पी. महाजन यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईचे आदेश दिल्यानंतर शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पत्र दिले आहे. त्यात डी. पी. महाजन यांच्याविरोधात शिस्तभंग विषयक कारवाई करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आदेश १५ सप्टेंबर २०२० रोजी दिले आहेत. हे आदेश प्राप्त झाल्यानंतर जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी के. बी. रणदिवे यांनी माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकार्‍यांना पत्र दिले आहे. त्यात डी. पी. महाजन यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याचे आदेश ३० सप्टेंबर रोजी काढले आहेत. माध्यमिक शिक्षण विभागाकडून हा प्रस्ताव सध्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन. पाटील यांच्याकडे पाठवण्यात आलेला आहे. आता यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content