नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कृषी कायद्यांविरोधात शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरला आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड वगळता देशभरात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या चक्का जामला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
ठिकठिकाणी शेतकरी आंदोलकांनी रस्त्यावर येत वाहतूक रोखली आहे. आंदोलकांनी पंजाब, हरयाणात जाणारे महामार्ग बंद केले. गाझीपूर बॉर्डरवरही शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं असून, “देशातील शेतकऱ्यांना मातीशी जोडू, नव्या युगाचा जन्म होईल,” असं शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर म्हटलं आहे.
१२ ते ३ या वेळेत चक्का जाम आंदोलन केलं जाणार आहे.उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर आणि उत्तराखंडमध्ये या राज्यांना चक्का जाम आंदोलनातून वगळण्यात आलं असून, उर्वरित देशभरात आंदोलन सुरू झालं आहे. ‘चक्का जाम’च्या काळात अत्यावश्यक सेवेतील आणि शाळेच्या बस व रुग्णवाहिकांना जाऊ दिलं जाणार आहे.