बुलढाणा, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | वीज वितरण क्षेत्रातील विविध उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत इन्डीपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने (आयपीपीएआय) देशपातळीवरील तब्बल सात पुरस्कारांनी महावितरणला गौरविण्यात आले आहे. बेळगाव (कर्नाटक) येथे शनिवारी (ता. ९) आयोजित ‘पॉवर अवार्ड २०२२’ कार्यक्रमामध्ये केंद्रीय ऊर्जा विभागाचे सहसचिव घनश्याम प्रसाद यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले.
इन्डीपेन्डंट पॉवर प्रोड्यूसर असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने देशातील विविध वीज वितरण कंपन्यांनी ग्राहकाभिमुख सेवा, नाविन्यता, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आदी वर्गवारीमध्ये केलेल्या कामगिरीचे मूल्यांकन करून ‘पॉवर अवार्ड २०२२’ जाहीर करण्यात आले आहे. त्यातील सर्वाधिक ७ पुरस्कारांवर महावितरणने विजेतेपदाची मोहोर उमटविली आहे. यामध्ये नुतनीकरणक्षम ऊर्जेला प्रोत्साहन देणारे सर्वोत्तम राज्य वर्गवारीमध्ये प्रथम पुरस्कार, इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन आणि सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वीज वितरण कंपनीमध्ये उत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार, आरएफ मीटरींग व मीटर डेटा आणि ग्राहक सेवेतील नाविन्य व माहिती तंत्रज्ञान सेवा वर्गवारीमध्ये सर्वोत्कृष्ट नवकल्पना पुरस्कार तसेच ग्राहक जागरूकता वाढविण्यासाठी उत्कृष्ट वितरण कंपनी आणि गेल्या दशकात ग्रामीण भागात सर्वात जलद विद्युतीकरण साध्य करणारी कंपनी म्हणून महावितरणला देश पातळीवर दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला आहे.
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्त्वात महावितरणने ही कामगिरी बजावली आहे. महावितरणचे कार्यकारी संचालक अरविंद भादीकर व अधीक्षक अभियंता मिलिंद दिग्रसकर यांनी बेळगाव येथे महावितरणच्या वतीने हे सर्व पुरस्कार स्वीकारले. देशपातळीवरील तब्बल सात पुरस्कारांचा सन्मान मिळाल्याबद्दल महावितरणचे सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा ऊर्जामंत्री ना. डॉ. नितीन राऊत, राज्य ऊर्जामंत्री ना. प्रसाद तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी अभिनंदन केले आहे.