नाना पटोले यांचा राजीनामा

 

मुंबई : वृत्तसंस्था । काँग्रेस नेते नाना पटोले यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने आता पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर त्यांच्या नियुक्तीच्या घोषणेची फक्त औपचारिकता बाकी आहे असे समजले जात आहे

नाना पटोले यांनी आज विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सोपवला . आता नव्या चर्चेप्रमाणे काँग्रेसकडे दुसरे उपमुख्यमंत्रीपद देऊन शिवसेना विधानसभा अध्यक्षपदावर कुणाची वर्णी लावणार आणि दुसरे उपमुख्यमंत्रीपद कोणत्या काँग्रेस नेत्याला मिळणार याची उत्सुकता वाढली आहे . दुसरीकडे या सगळ्या ताळमेळात राष्ट्रवादी काँग्रेस काय भूमिका घेणार ? हा ही नवा प्रश्न विचारला जातो आहे . त्यामुळे पुढचे काही दिवस पुन्हा राज्यातील राजकीय घडामोडी रंगणार आहेत

गेल्या अनेक दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बदलणार असल्याची चर्चा सुरू आहे विद्यमान प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे महसूल मंत्री पद असल्यामुळे त्यांच्याकडील पद काढून ते अन्य नेत्याला द्यावे याबाबतचा मंथन पक्षश्रेष्ठी करत होते. या अनुषंगाने अनेक नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष पद मिळावे यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली होती. यात विशेष करून माजी खासदार राजीव सातव, महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार आणि विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांचा समावेश होता. यापैकी विजय वडेट्टीवार यांनी तर निकराचे प्रयत्न केले मात्र आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा ही विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या गळ्यात पडणार असल्याचे जवळपास स्पष्ट झालेले आहे कालच नाना पटोले यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्यांना प्रदेशाध्यक्ष पद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले होते.

Protected Content