आळंदी वृत्तसंस्था । ‘विठ्ठलाच्या, माऊलीच्या आणि तुकोबांच्या दर्शनासाठी कुणाच्या परवानगीची गरज नाही. तसं कुणाला वाटत असेल आणि कुणी परवानगी नाकारण्याची भाषा करत असेल तर त्याला वारकरी संप्रदायाचा विचार समजलाच नाही. तो सच्चा वारकरीच नाही,’ असा सणसणीत टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वारकरी परिषदेला हाणला. आळंदीतील जोग महाराज पुण्यतिथी सोहळ्यात उपस्थितांना संबोधित करताना पवार बोलत होते.
‘शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत. ते नेहमीच हिंदू धर्माला विरोध करतात. रामायणाला विरोध करतात. नास्तिक मंडळींना पाठिंबा देतात. त्यामुळं त्यांना वारकऱ्यांच्या कुठल्याही कार्यक्रमाला बोलावू नका, असे आवाहन वारकरी परिषदेने केले होते. वारकरी परिषदेचे वक्ते महाराजांनी त्याबाबतचे एक पत्रक प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर झालेल्या आजच्या सोहळ्यात पवार काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष लागले होते.
पवारांनी आपल्या खास शैलीत वारकरी परिषदेचा समाचार घेतला. ‘विठ्ठलाला भेटायला पंढरीला जायचं असतं. माऊलीच्या दर्शनाला आळंदीला जायचं असले आणि तुकोबांसाठी देहूला जायचं असते. तिथे जायला परवानगी नाही असे कुणी सांगत असेल तर त्यांना वारकरी संप्रदायाचा विचारच समजला नाही. असा विचार करणारा सच्चा वारकरी नाही, असं मला वाटतं. पण अशा गोष्टी होत असतात. लहानसहान गोष्टींकडे दुर्लक्ष करायचे असते,’ असा चिमटाही पवारांनी यावेळी काढला.