यमुना नगरात बंद घर फोडले; ४४ हजारांचा ऐवज लंपास

chori

जळगाव प्रतिनिधी । वडीलांच्या निधनानंतर मुळगावी थांबलेल्या यमुनानगरातील लेणेकर दाम्पत्याच्या घरी अज्ञात चोरट्यांनी डल्ला मारीत ४४ हजार ३०० रूपयांच्या ऐवज लांबविल्याची घटना शनिवारी उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, संजय लेणेकर हे अयोध्यानगर परिसरातील यमुनानगरात पत्नी आशा यांच्यासाहेबत वास्तव्यास आहेत़ एमआयडीसी परिसरातील बॅन्जो केम. इंडस्ट्रिज प्रा.लि. कंपनीत ते काम करून कुटूंबीयांचा उदरनिर्वाह करतात़ दरम्यान, वडील निनाजी लेणेकर यांची प्रकृती ठीक नसल्यामुळे संजय हे १६ जानेवारी रोजी पत्नीसह बुलढाणा येथे गेले होते़ त्यामुळे त्यांचे कुलूप बंद होते़ दुस-या दिवशी १७ रोजी वडीलांचे निधन झाल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी लेणेकर दाम्पत्य बुलढाणा जिल्ह्यातील शेलापूर बुद्रूक या मुळगावी गेले होते़ त्यानंतर तेथेच थांबले.

अन् चोरट्यांनी मारला डल्ला
पाच ते सहा दिवसांपासून घर कुलूप बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी लेणेकर दाम्पत्याच्या यमुनानगरातील घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी केली़ दरम्यान, २५ जानेवारी रोजी शेजारी राहणारी महिला सीमा सरोदे यांना लेणेकर यांचे घर उघडे दिसल्याने त्यांनी त्वरित आशा लेणेकर यांना संपर्क साधून आपण घरी आला आहात का? अशी विचारणा करीत घर उघडे असल्याचे सांगितले़ मात्र, आम्ही घरी नसल्याचे सांगितल्यानंतर घरात चोरी झाल्याचे सरोदे यांच्या पाहणीत आढळून आले़ यावेळी चोरट्यांनी घरातील सामान अस्ताव्यस्त फेकलेला होता़

दागिन्यांसह रोकडवर हात साफ
२५ जानेवारीला सायंकाळी ६ वाजता लेणेकर दाम्पत्य यमुनानगरातील राहत्या घरी पोहोचल्यानंतर त्यांनी घराची पाहणी केली असता त्यांना सामान अस्ताव्यस्त फेकलेले दिसून आले़ त्यातच कपाट फोडलेले व त्यातील ६ हजार रूपये किंमतीची दोन ग्रँम वजनाची चैन, ९ हजार रूपये किंमतीच्या तीन ग्रँम वजनाच्या सोन्याच्या फुल्या तसेच १ हजार रूपये किंमतीचे दोन भार वजनाचे दाने चांदीच्या अंगठ्या, १ हजार रूपये किंमतीची दोन भार वजनाची चांदीची चैन, ७०० रूपये किंमतीची बेंटेक्सची चेन व पेंडल, ६०० रूपये किंमतीच्या बेंटेंक्सच्या बांगड्या, १ हजार रूपये किंमतीचा स्पीकर तसेच २५ हजार रूपयांची रोकड असा एकूण ४४ हजार ३०० रूपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे त्यांना आढळून आले. घरमालक संजय नेलेकर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content