दुचाकींची समोरासमोर धडक; तीन जण गंभीर जखमी

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील कुऱ्हा रोडवरील सागर बिअरबार दुकानाजवळ दुचाकी अपघातात दाम्पत्यासह दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, सुखदेव ओमकार भारूडे (वय-४८) रा. कुऱ्हे पानाचे ता. भुसावळ हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ११ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास सुखदेव भारूडे हे पत्नी छाया आणि रोशन प्रभाकर साळी यांच्यासोबत दुचाकी (एमएच १९ सीए ४३३३) हे कुऱ्हा ते वराडसीम रस्त्यावरील रिदम हॉस्पिटल जवळून जात असतांना समोरून येणारी दुचाकी (एमएच १९ डीसी २०४०) ने जोरदार धडक दिली. या धडकेत सुखदेव भारूडे, त्यांची पत्नी छाया भारूडे आणि रोशन प्रभाकर साळी हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना खासगी रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. तर दोन्ही दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात दुचाकीस्वार किरण सुरेश निकम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ युनूस शेख करीत आहे.

Protected Content