दिल्ली भाजपचे निमंत्रण अण्णा हजारे यांनी नाकारले

नगर वृत्तसंस्था । दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सरकारविरोधात पुकारलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचे भाजपचे निमंत्रण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी नाकारले आहे.

उलट ‘दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले सरकार त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? ‘असा सवाल हजारे यांनी भाजपला केला आहे. आपल्या उत्तरात हजारे यांनी भाजपसह सर्वच पक्ष आणि आंदोलनाच्या विरोधकांनाही खडे बोल सुनावले आहेत.

भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आदेश गुप्ता यांनी हजारे यांना पत्र लिहून भाजपच्या आंदोलनात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले होते. हे पत्र प्रसारमाध्यमांत प्रसिद्ध झाल्यानंतर हजारे यांनी त्यांना उत्तर पाठविले आहे. या पत्रात हजारे यांनी म्हटले आहे की, ‘तुमचे पत्र वाचून मला वाईट वाटले. तुमचा पक्ष मागील सहा वर्षाहून अधिक काळ देशात सत्तेत आहे.

जगातील सर्वाधिक सदस्य असल्याचा दावा करणारे नेते, मंदिरात १० बाय १२ फूट खोलीत राहणाऱ्या ८३ वर्षीय अण्णा हजारे यांच्यासारखे, ज्यांच्याकडे पैसा नाही, संपत्ती नाही, सत्ता नाही अशा माणसाला दिल्लीत आंदोलन करण्यासाठी बोलावत आहे, यापेक्षा दुर्दैवी आणखी काय असू शकते. केंद्रात आपल्या पक्षाचे सरकार आहे. दिल्ली सरकारचे अनेक विषयही केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत. सीबीआय, कायदा-सुव्यवस्था, विजिलन्स, दिल्ली सरकारचे पोलिस केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहेत.

पंतप्रधान नेहमीच असा दावा करतात की केंद्र सरकारने भ्रष्टाचार निर्मूलनासाठी कठोर पावले उचलली आहेत. अशीच परिस्थिती असेल आणि दिल्ली सरकारने भ्रष्टाचार केला असेल तर आपले सरकार त्यांच्याविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई का करीत नाही? की भ्रष्टाचार निर्मूलनाचे केंद्र सरकारचे सर्व दावे निरर्थक आहेत?’ असे प्रश्नच हजारे यांनी उपस्थित केले आहेत.

आपल्या आंदोलनांबद्दल सांगताना हजारे यांनी म्हटले आहे, ‘मी कोणताही पक्ष किंवा पार्टी पाहून आंदोलने केलेली नाहीत. मला कोणत्याही पक्षाशी घेणेदेणे नाही. फक्त गाव, समाज आणि देशाच्या भल्यासाठीच मी आंदोलन करीत आलेलो आहे. सत्तेत असलेल्या पक्षाच्या विरोधात आंदोलन केल्यानंतर त्या पक्षाने नेहमी माझे नाव दुसऱ्या पक्षासोबत जोडले आहे.

आमच्या आंदोलनामुळे ज्या पक्षाचे नुकसान झाले आहे, तो पक्ष मला आणखी कुठल्या तरी पक्षाचा हस्तक ठरवून गैरसमज पसरवित असतो. आजपर्यंत अनेक वेळाला माझी निंदा करण्याचा प्रयत्न झालेला आहे. परंतु आपल्याला काही फरक पडत नाही. मी आजही तोच अण्णा हजारे आहे.’!

भाजपवर टीका करताना हजारे यांनी म्हटले आहे की, ‘वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात २०११ चे दिल्ली आंदोलन झाले. त्यानंतर २०१४ मध्ये भ्रष्टाचारमुक्त भारताचे स्वप्न दाखवून तुमचे सरकार सत्तेत आले. परंतु जनतेच्या समस्या काही कमी झाल्या नाहीत. सद्य परिस्थितीत मला वाटत नाही की देशातील कोणताही पक्ष देशाला उज्ज्वल भविष्य देण्यास सक्षम आहे.

आज अनेक पक्ष सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता या चक्रात गुंतलेले आहेत. कोणताही पक्ष किंवा पार्टी सत्तेत असली तरी व्यवस्था बदलल्याशिवाय परिवर्तन होणार नाही, लोकांना दिलासा मिळणार नाही. म्हणून मी दिल्लीत येऊन काही फरक पडणार नाही, अशी माझी धारणा आहे. देशात बदल फक्त पक्ष बदलून नव्हे तर व्यवस्था बदलून होईल. सिर्फ हंगामा खडा हो यह हमारा मकसद नहीं, हमारी कोशिश है की सुरत बदलनी चाहीए’, असेही हजारे यांनी गुप्ता यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.\

Protected Content