नवी दिल्ली वृत्तसंस्था । अयोध्या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात आज निकाल सुनावण्यात येणार असून याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागल्याचे दिसून येत आहे. तर, निकालाच्या पार्श्वभूमिवर, देशभरात सतर्कता बाळगण्यात येत आहे.
अयोध्या येथील बाबरी मशिद व राम जन्मभूमि वादावर आज सर्वोच्च न्यायालय निकाल देणार आहे. ६ ऑगस्टपासून न्यायालयात या प्रकरणी दररोज सुनावणी घेण्यात आली. काल सायंकाळीच शनिवारी या प्रकरणाचा निकाल लागणार असल्याची माहिती जाहीर करण्यात आली. या पाठोपाठ देशातील संवेदनशील ठिकाणांवर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. बहुतांश शहरांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलेली आहे. सकाळी साडेदहा वाजता सुप्रीम कोर्ट या प्रकरणाचा निकाल देणार आहे. हा निकाल नेमका काय लागतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.