नवी दिल्ली: वृत्तसंस्था । जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम दिल्लीमध्ये छापा टाकून ८३२ कोटी रुपयांच्या करचोरीचे प्रकरण उघडकीस आणले आहे. एका व्यक्तीला अटक देखील करण्यात आली आहे.
जीएसटी करचोरी करणारा व्यक्ती पानमसाला बनवत होता. जीएसटी नोंदणी न करता तो पान मसाल्याचा पुरवठा करत होता. जीएसटी विभागाला पान मसाला बनवणाऱ्या कंपनीबद्दल माहिती मिळाली होती. जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पश्चिम दिल्लीमध्ये जाऊन छापा टाकला. अधिकाऱ्यांनी छापा टाकला त्यावेळी कंपनीत काम सुरु होते. यावेळी पान मसाला तयार करण्याचा कच्चा माल, मशिनरी आणि तयार झालेला पान मसाला जप्त केला. अधिकाऱ्यांनी टाकलेल्या छाप्यावेळी कंपनीत ६५ कामगार काम करत होते.
पानमसाला तयार करण्याचा कारखान्यातून सुमारे ४. १४ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. जीएसटी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या पानमसाला तयार करणाऱ्या कंपनीनं सुमारे ८३२ कोटी रुपयांची जीएसटी कराची चोरी केली आहे.
या ठिकाणी तयार करण्यात येणार होणार पानमसाला विविध राज्यांमध्ये पाठवण्यात येत असल्याची माहिती जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला न्यायालयात हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आळी आहे.
जीएसटी विभागानं चालू आर्थिक वर्षामध्ये करचोरीची प्रकरण मोठ्या प्रमाणावर उघडीकस आणली आहे. चालू आर्थिक वर्षात दिल्ली विभागात ४३२७ कोटी रुपयांच्या टॅक्स चोरीचा भांडाफोड करण्यात आला आहे. जीएसटी करचोरी प्रकरणी आतापर्यंत १५ लोकांना अटक करण्यात आल्याची माहिती, जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
नव्या वर्षांत अनेक नियमांमध्ये बदल झाला आहे. 2021 मध्ये बँकिंग, फायनान्स, टॅक्स आणि इतर नियम बदलले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे जीएसटी रिटर्न फायलिंगमध्येही बदल करण्यात आले आहेत. केंद्र सरकारनं केलेल्या बदलांमुळे दर महिन्याला जीएसटी रिटर्न फाईल करणाऱ्या व्यापारांना दिलासा मिळणार आहे. जे व्यापारी दरवर्षी जीएसटी रिटर्न फाईल करत होते त्यांना तीन महिन्यांनंतर रिटर्न भरण्याची सुविधा मिळणार आहे.