नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीतील इस्रायली दूतावास परिसरात शुक्रवारी बॉम्बस्फोट झाला या कमी क्षमतेच्या बॉम्बस्फोटाची जैश उल हिंद या संघटनेनं जबाबदारी घेतली आहे.
टेलिग्राम चॅटमधूनतशी माहिती पुढे आली असून, तपास यंत्रणांकडून त्याची पडताळण केली जात आहे. या आधी एक चिठ्ठी यंत्रणांना घटनास्थळी सापडली होती. त्यातून हा दहशतवादी हल्ला असल्याचे संकेत मिळाले होते.
केंद्रीय तपास यंत्रणांना संशयित चॅनेलची टेलिग्रामवर एक चॅट मिळाली आहे. ज्यात जैश उल हिंदने दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटाची जबाबदारी स्वीकारली आहे. या चॅटमध्ये दहशतवादी संघटना हल्ल्यावर अभिमान व्यक्त करताना दिसत आहे. मात्र, यंत्रणांकडून जैश उल हिंदकडून करण्यात आलेल्या दाव्याची पडताळणी केली जात आहे.
परिसरातील तीन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी अधिकाऱ्यांनी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक कॅब दिसून आली आहे. या कॅबने दोन लोकांना घटनास्थळी सोडलं होतं. त्यानंतर कॅब निघून गेल्याचं दिसत आहे. कॅबमधून उतरल्यानंतर दोन्ही व्यक्ती ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, तिथे पायी जात असल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं आहे. सीसीटीव्ही ही माहिती मिळाल्यानंतर स्पेशल सेलने कॅब चालकाशी संपर्क केला असून, दोन्ही व्यक्तींची स्केच तयार केली जात आहे. बॉम्बस्फोट झालेल्या ठिकाणी पोलिसांना बरंच साहित्य मिळालं असून, यात एक लिफाफा सापडला. लिफाफ्यात एक चिठ्ठी होती. या चिठ्ठीत ‘हा तर फक्त ट्रेलर आहे.’ असा इशारा देणारा मजकूर लिहिलेला असल्याची माहिती समोर आली आहे. या चिठ्ठीत इराण लष्कराचे कमांडर कासीम सुलेमानी आणि अण्वस्त्र शास्त्रज्ञ मोहसीन फखरजादेह यांच्या नावांचा शहीद असा उल्लेख करण्यात आलेला आहे. दोघांचीही गेल्या वर्षी हत्या करण्यात आली होती. बगदाद विमानतळाजवळ कासीम सुलेमानी यांची ड्रोन हल्ला करून हत्या करण्यात आली होती.