दिल्लीतील आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी राज्यात उद्या डाव्यांचे आंदोलन

मुंबई : वृत्तसंस्था । केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधी कायद्यांच्या निषेधार्थ सुरू असलेले देशव्यापी आंदोलन तीव्र करण्यासाठी ३ डिसेंबर रोजी राज्यात उग्र आंदोलन करण्याचा निर्णय अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या महाराष्ट्र राज्य समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे.

“महाराष्ट्रात अतिवृष्टी झाली, दुधाचे भाव कोसळले, शेती माल खरेदी केंद्र बंद आहेत, यांवर महाराष्ट्रातील सरकारकडून शेतकऱ्यांना कोणतीही मदत मिळाली नाही. तरी ही मंडळी गप्प आहेत. एक शब्दपण काढला नाही. डाव्यांचा ढोंगीपणा तो हाच.” असं केशव उपाध्ये यांनी ट्विटद्वार म्हटलं आहे.

दरम्यान, संघर्ष समितीच्या या हाकेला प्रतिसाद देत महाराष्ट्रात सर्व समविचारी शेतकरी संघटना तसेच शेतमजूर, कामगार, विद्यार्थी, युवक, महिला संघटनांना बरोबर घेत ३ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयावर मोर्चे काढून ठिकठिकाणी रास्ता रोको करून शेतकऱ्यांचे हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

या बैठकीत शेतकरी नेते राजू शेट्टी, डॉ. अशोक ढवळे, मेधा पाटकर, प्रतिभा शिंदे, नामदेव गावडे, सीमा कुलकर्णी, सुभाष लोमटे, डॉ. अजित नवले यांनी सहभाग घेतला होता.

महाराष्ट्रातील कामगार, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, विद्यार्थी संघटना व समाजसेवी संघटनांचे व्यासपीठ असलेल्या जनसंघटनांच्या समन्वय समितीची ऑनलाइन बैठक विश्वास उटगी यांच्या पुढाकाराने होऊन या समितीनेही ३ डिसेंबरच्या राज्यातील आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला असल्याचे डॉ. अजित नवले यांनी सांगितले आहे.

Protected Content