यावल : प्रतिनिधी । तालुक्यातील कोविडमुक्त गावातील शाळांमध्ये आरोग्य विभागाकडून शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे.
कोरोना विषाणु संसर्गाच्या संकटातुन हळुवार आपण बाहेर जात असतांना शासनाच्या शिक्षण विभागाच्या आदेशान्वये यावल तालुक्यात शाळा सुरू झाल्याच्या पार्श्वभुमीवर राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या निर्देशानुसार कोविडमुक्त क्षेत्रात इयत्ता ८ ते १२ चे वर्ग १५ जुलैपासून सुरू झाले.
राज्यातील कोविड मुक्त क्षेत्रात ग्रामपंचायती/ स्थानिक स्वराज्य संस्थाच्या ठरावांनी राज्य शासनाने निर्देशित केलेल्या निकषाच्या आधारे व कोविड प्रोटोकॉलचे पालन करून पहिल्या टप्प्यात इयत्ता ८ वी ते १२ वीचे वर्ग १५ जुलैपासून सुरू करण्यास शासन मान्यता देण्यात आलेली आहे.
संबंधित शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कोविड १९ साठीची चाचणी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हेमंत बऱ्हाटे, प्राथमिक आरोग्य केंद्र सावखेडासिमचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गौरव भोईटे व डॉ. नसीमा तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.
सावखेडासिम प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील दहिगाव येथील आदर्श विद्यालयात उपस्थित २१ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरटीपीसीआर चाचणी करून नमुने तपासणीसाठी जळगाव येथे पाठवण्यात आलेले आहेत. कोरपावली येथील जैन विद्यालयात ११ शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रॅपिड एंटीजन चाचणी करण्यात येऊन सर्व अहवाल निगेटिव्ह आलेले आहेत. स्वॅब समुदाय आरोग्य अधिकारी डॉ. खालीद शेख व राजेंद्र बारी यांनी घेतले.
आदर्श विद्यालय दहिगावचे मुख्याध्यापक एस डी चौधरी व संपूर्ण स्टॉप तसेच जैन विद्यालय कोरपावलीचे मुख्याध्यापक एस आय तडवी , संपूर्ण शिक्षकांचे व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन आणी सहकार्य लाभले.