कोल्हापूर: वृत्तसंस्था । शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हिताशी काँग्रेसला काहीही देणे घेणे नाही, त्यांचा डोळा फक्त दलालाकडून मिळणाऱ्या पैशावर आहे, दलाली बंद होणार असल्यानेच ते केंद्रीय कृषी कायद्याला केवळ राजकारण म्हणून विरोध करत आहेत, असा आरोप केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला.
नवीन कृषी कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगताना दानवे यांनी तरतुदींचा उल्लेख केला. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत शेतकऱ्यांच्या हिताचेच निर्णय घेतले आहेत. यापुढेही त्याच पद्धतीचे निर्णय घेत दोन वर्षांत शेतकऱ्यांना मिळणारा नफा दुप्पट करण्यात येईल. नवीन विधेयकामुळे बाजार समित्या नष्ट होतील अशी भीती दाखवण्यात येत असल्याचा आरोप करत ते म्हणाले, असे काही होणार नाही. बाजार समित्यांचे अस्तित्व कायम राहील. फक्त समितीत काही व्यापाऱ्यांची जी टोळी तयार झाली आहे, त्याला लगाम बसेल. नवीन व्यापारी स्पर्धेत येऊन शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल.
सध्या काँग्रेससह ज्या पक्षांचा नवीन कृषी कायद्यांना विरोध सुरू आहे, तोच शेतकऱ्यांच्या हिताचा नाही. आतापर्यंत हे विधेयक आणा म्हणून आग्रह करणारे आता केवळ आपले अस्तित्व नष्ट होईल, आपले राजकीय नुकसान होईल, या भीतीपोटी विरोध करत आहेत. शेतकरी आणि शेतीच्या विकासासाठी काहीही करायला आपण तयार आहोत हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दाखवून दिले आहे. पण असे झाले तर शेतकरी आपल्या पासून दुरावतील या भीतीपोटी काँग्रेससह काही पक्ष नसलेल्या तरतुदी सांगत, अफवा पसरवत आंदोलन करत आहेत. हा केवळ राजकीय विरोध आहे. स्वतःचे राजकारण सुरक्षित करण्याचा हा डाव आहे असा टोलाही त्यांनी मारला.
राज्य सरकारने केंद्राच्या या कायद्यांची अंमलबजावणी करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे पण ही हुकूमशाही असल्याचे सांगत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले. कायदा माहीत नसलेले हे सरकार आहे. केंद्राने कायदा केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करावीच लागते ती करायची नसेल तर तसा कायदा करून त्याला राष्ट्रपतींची संमती घ्यावी लागते, असे काही न करता एका आमदाराच्या पत्रावर कृषी कायद्याला स्थगिती देणे हे चुकीचे आहे.