दंडात्मक कारवाई करून हॉकर्सच्या हातगाड्या सोडा ; महापौर सोनवणे

जळगाव,प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर मनपा प्रशासनाकडून अतिक्रमण करणाऱ्यांवर मोठ्याप्रमाणात कारवाई करण्यात आली होती. कारवाई दरम्यान जप्त केलेल्या हातगाड्या गेल्या दीड महिन्यापासून मनपा प्रांगणात पडून आहेत. जप्त केलेल्या हातगाड्या दंडात्मक कारवाई करून सोडण्याच्या सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या.

मनपाच्या प्रांगणात सोमवारी एका शेतकऱ्याने टरबूज ओतल्याच्या पार्श्वभूमीवर आज मंगळवारी महापौर भारती सोनवणे यांनी दालनात बैठक बोलावली होती. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, मनपा उपायुक्त संतोष वाहुळे, अतिक्रमण अधीक्षक एच.एम.खान, माजी मंत्री आ.गिरीष महाजन यांचे जनसंपर्क अधिकारी अरविंद देशमुख, राष्ट्रवादी महानगराध्यक्ष अभिषेक पाटील, जेष्ठ पत्रकार दिलीप तिवारी, मल्टीमिडिया सर्व्हिसेसचे सुशील नवाल, ऍड. कुणाल पवार, नगरसेवक कुलभूषण पाटील, अमित भाटिया आदी उपस्थित होते.

काल झालेल्या प्रकारची सर्व माहिती ऐकून घेतल्यानंतर महापौर भारती सोनवणे यांनी सांगितले की, मी स्वतः एका शेतकऱ्याची मुलगी असून शेतकरी घेत असलेल्या कष्टाची मला जाण आहे. शेतकरी थेट ग्राहकांना माल विक्री करीत असेल तर त्यांच्यावर अन्याय होता कामा नये. शेतकरी कुठेही भाजीपाला, फळे विक्री करीत असेल आणि त्याठिकाणी सोशल डिस्टनसिंगचे पालन होत नसल्यास त्यांना अगोदर सूचना द्यावी आणि तरीही ऐकत नसेल तर प्रतिबंधात्मक कारवाई करावी अशा सूचना महापौरांनी दिल्या. गेल्या दीड महिन्यात अतिक्रमण विभागाने कारवाई करून मोठ्याप्रमाणात हातगाड्या जप्त केल्या आहे. अनेक हॉकर्स दररोज भाड्याने हातगाड्या घेऊन येतात. हातगाड्या जप्त असल्याने त्यांचा रोजगार हिरावला गेला असून त्यांना हातगाडीचे भाडे द्यावे लागत असल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. लॉकडाऊनमध्ये देखील जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी मनपाने जागा निश्चित करून दिल्या आहे. त्याठिकाणी हातगाड्या लावण्यासाठी हॉकर्सला त्यांच्या गाड्या दंडात्मक कारवाई करून परत द्याव्या, अशा सूचना महापौर भारती सोनवणे यांनी दिल्या. दरम्यान, अतिक्रमण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची बदली करण्याचा निर्णय मनपा आयुक्त व प्रशासन घेणार असल्याचेही बैठकीत स्पष्ट झाले.

Protected Content