मुंबई : वृत्तसंस्था । भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे राज्यातील निवडक समर्थक नेत्यांना सोबत घेत थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करत आहेत . काही माजी आमदार सोबत येत असल्याचे त्यांनी आधीच सांगितल्यामुळे या नेत्याच्या नावांची उत्सुकता आहे
राज्याच्या राजकारणात विविध प्रतिक्रिया उमटवणारा हा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशाचा निर्णय नाथाभाऊंनी ३ दिवसांपूर्वी जाहीर केला तेव्हापासून त्यांचे समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांवर हल्ले – प्रतिहल्ले सुरु केले आहेत . राज्यभर नाथाभाऊंच्या भूमिकेचे समर्थन करणारे आहेत पण उघडपणे आताच बोलायला कुणी तयार नाही असे नाथाभाऊंच्या गोटातून सांगितले जात आहे . त्याचवेळी पक्षाच्या पातळीवर नाथाभाऊंना कोणते स्थान जबाबदारी आणि पद दिले जाते याचीही राज्यात उत्सुकता सर्वांना आहे . या पक्ष प्रवेशाच्या वेळी शरद पवार नेमके काय भाष्य करतील आणि भाजपवर टीकेची भूमिका कशी घेतील याकडेही राजकीय जाणकारांचे लक्ष लागलेले आहे
जळगाव जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्र भागात भाजप सोडून गेल्यावर नाथाभाऊ प्रतिस्पर्धी म्हणून भाजप नेत्यांची कशी गोची करतील , त्यासाठी त्यांना नव्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आणि भाजप मधील फडणवीस विरोधी गटाची कशी साथ मिळेल याचा अंदाज लावण्यासाठीही आजच्या प्रवेश सोहळ्यात नाथाभाऊंच्या सोबत आज कोण कोण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतात हे स्पष्ट असावे असे जाणकारांनी सांगितले .
नाथाभाऊंचा स्वभाव आणि कामाची पद्धत या मुद्द्याचा आधारपण जाणकारांकडून असे अंदाज लावण्यासाठी घेतला जातोय . राज्याच्या राजकारणात अभ्यासू आणि वैयक्तिक पातळीवर फारसा कुणाशी उभा दावा न मांडणारा नेता अशी नाथाभाऊंची प्रतिमा आहे . त्यामुळे आतापर्यंतच्या काळात प्रकाशात न आलेले नाथाभाऊंचे अन्य नेत्यांच्या सोबत असलेले सख्य आज उजागर झाल्यावर भविष्यातील बऱ्याच मुद्द्यांचे आडाखे लावण्याचे काम राजकीय वर्तुळात सुरु आहे .