‘त्या’ शपथविधीबाबत फडणविसांना पश्‍चात्ताप !

मुंबई प्रतिनिधी | पहाटे घेतलेल्या शपथविधीबाबत देवेंद्र फडणवीस यांना पश्‍चात्ताप वाटत असून यात नेमके काय घडले या संदर्भात आपण स्वत:च्या पुस्तकात गौप्यस्फोट करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पाहाटेच्या सुमारास मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याच्या निर्णयावर भाष्य केले आहे. मुंबई तक या पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, मी यापूर्वीदेखील बोललो आहे, आज मला त्याचा पश्चाताप आहे, की हे नसते केले तर बरे झाले असते. आपण लढलो असतो. एवढेच नाही, तर आता बेईमानी कुणी, कुठे आणि कशी केली, काय काय केली. हे मात्र, माझ्या पुस्तकात कळेल. त्याची वाट बघा.

फडणवीस पुढे म्हणाले, अजित पवारांसोबत आम्ही जे सरकार तयार केले होते, ते एका वेगळ्या भावनेतून तयार केले होते. कारण आमच्यासोबत विश्वास घात झाला होता आणि दोन्हीकडून झाला होता. त्या विश्वास घातानंतर आम्हाला वाटले, की आमच्या पाठीत खंजीर खुपसला गेलाय. तर राजकारणात जिवंत रहायला पाहिजे, जशास तसे उत्तर दिले पाहिजे. म्हणून ते केले. त्यावेळी असे वाटत होते की, काय असते ना, एक खुन्नस असते, आपल्याला एवढा धोका दिला? एवढी आपल्यासोबत बेइमानी झाली? चला दाखवून देऊ. त्या भावनेतून ते केले. ठीक आहे आता तो विषय संपला. फडणवीस म्हणाले की, ते एक पुस्तक लिहीत आहेत, ते त्यात सर्व घटनांचा उहापोह करणार आहेत. एवढेच नाही तर महाराष्ट्रात सध्या केवळ सरकार आहे, शासन नाही, असेही ते म्हणाले.

यावेळी फडणवीस यांनी, महाराष्ट्रात कोरोनाला चुकीच्या पद्धतीने हाताळल्याबद्दल, राज्य सरकारेंवर जोरदार टीका केली. राज्य सरकारने १०००० कोरोना मृत्यू लपवल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.

Protected Content