स्पेशल रिपोर्ट : जिल्हा परिषदेतील जागांमध्ये ‘इतकी’ वाढ शक्य !

जळगाव, जितेंद्र कोतवाल | राज्य मंत्रीमंडळाच्या निर्णयानुसार आता जळगाव जिल्हा परिषदेतील जागांमध्येही वाढ होणार असल्याने राजकीय वर्तुळात कुतुहलाचे वातावरण निर्मित झाले आहे. सरकारन टक्केवारीचा कोणताही निकष या निर्णयात जाहीर केला नसला तरी एकंदरीत जागांच्या वाढीचे प्रमाण पाहता जळगाव जिल्हा परिषदेतील जागा वाढीबाबतचा अंदाज समोर आला असून यामुळे जि.प. मधील समीकरणांवर व्यापक परिणाम पडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पहा याबाबत लाईव्ह ट्रेंडस न्यूजचा एक्सक्लुझीव्ह वृत्तांत.

राज्यातील जिल्हा परिषदांची सदस्य संख्या वाढवण्याबाबत सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून या संदर्भातील विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. सध्या राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५० व जास्तीत जास्त ७५ एवढी आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ मधील कलम ९ (१) मध्ये सुधारणा करून जिल्हा परिषद सदस्यांची संख्या कमीत कमी ५५ व जास्तीत जास्त ८५ असे करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. या सुधारणेमुळे सध्याची जिल्हा परिषद सदस्यांची संख्या २००० वरून २२४८ इतकी होईल. त्याचप्रमाणे पंचायत समिती सदस्यांची संख्या देखील ४००० वरून ४४९६ इतकी होणार आहे.

राज्य मंत्रीमंडळाच्या या निर्णयाचा जळगाव जिल्हा परिषदेतील जागांवरही परिणाम होणार आहे. जिल्ह्यात सध्या जिल्हा परिषदेचे ६७ गट आहेत. यात शेंदुर्णी येथे नगरपंचायत झाली असून अलीकडेच नशिराबाद येथे देखील नगरपरिषदेची घोषणा करण्यात आलेली आहे. यामुळे हे दोन्ही गट लोप पावणार आहेत. मंत्रीमंडळाने जाहीर केल्यानुसार जिल्हा परिषदेत सरासरी सुमारे ११.२४ टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. याचा विचार केला असता जळगाव जिल्हा परिषदेत सात जागा वाढण्याची शक्यता आहे. यामुळे जिल्हा परिषदेतील गटांची संख्या ७४ वा ७५ होऊ शकते. वाढीव जागांमुळे आता इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या असून नेमक्या कोणत्या तालुक्यात किती जागा वाढतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Protected Content