तीन न्यूज चॅनेल्सना दंड; प्रेक्षकांची माफी मागण्याचे निर्देश

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । तबलिगी जमातच्या मरकजबद्दल करण्यात आलेल्या वार्तांकनावरून तीन वृत्तवाहिन्यांना दंड ठोठावत प्रेक्षकांची माफी मागण्यासही सांगण्यात आलं आहे. न्यूज ब्रॉडकास्टिंग स्टॅण्डर्ड अथॉरिटीने ही कारवाई केली आहे.

 

देशात २०२० मध्ये कोरोनानं शिरकाव केल्यानंतर भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. देशात अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली असतानाच दिल्लीस्थित निजामुद्दीन येथे झालेलं तबलिगी जमात मरकज चर्चेत आलं होतं. दिल्लीत झालेल्या या कार्यक्रमानंतर उपस्थित असलेले लोक वेगवेगळ्या राज्यात परतले. त्यानंतर कोरोना प्रसारासाठी या घटनेला जबाबदार धरण्यात आलं होतं.

 

दिल्लीत तबलिगी जमातचा धार्मिक कार्यक्रम झाला होता. १३ ते २४ मार्चच्या दरम्यान निजामुद्दीनमध्ये तबलिगी जमातच्या १६,५०० लोकांनी भेट दिली होती. त्यानंतर ३० मार्च रोजी हा परिसर सील करण्यात आला होता. त्यानंतर कोरोना प्रसाराचा ठपका या कार्यक्रमावर ठेवण्यात आला होता. काही वृत्तवाहिन्यांनी आक्षेपार्ह वार्तांकन केल्याचं मत विविध न्यायालयांनी नोंदवलं होतं. त्यानंतर आता एनबीएसने ही कारवाई केली आहे.

 

तबलिगी जमातीविषयी करण्यात आलेलं वार्तांकन अत्यंत आक्षेपार्ह आणि केवळ अंदाजावर आधारित होतं, असं एनबीएसएने म्हटलं आहे. “वृत्तवाहिन्यांवरून प्रसारित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची भाषा असभ्य होती.त्यात पूर्वग्रहदूषितपणा आणि आपत्तीजनक होती. कार्यक्रमातील भाषा चिथावणी देणारी होती आणि धार्मिक भावनाचा विचार न करता आणि सामाजिक सौहार्दतेची चौकट तोडणारी होती. सामाजिक तेढ निर्माण करून त्याला चिथावणी आणि प्रोत्साहन देणारी भाषा होती,” असं एनबीएसएने म्हटलं आहे.

 

एनबीएसएने एका वृत्तवाहिनीला एक लाख, तर दुसऱ्या प्रादेशिक वृत्तवाहिनीला ५० हजारांचा दंड ठोठावला आहे. १ लाख रुपये दंड ठोठावण्याबरोबरच संबंधित वृत्तवाहिनीने या कार्यक्रमाबद्दल २३ जून रोजी रात्री ९ वाजता प्रसारित केल्या जाणाऱ्या बातमीपत्राच्या अगोदर प्रेक्षकांची माफी मागण्याचे निर्देशही दिले आहेत. एका इंग्रजी वृत्तवाहिनीलाही या प्रकरणात दोषी धरण्यात आलं असून, दंड ठोठावण्यात आला आहे. या इंग्रजी वृत्तवाहिनीने तबलिगी जमात कार्यक्रमाबद्दल आणि नंतर प्रसारित केलेली दृश्य जुळत नसल्याचंही एनबीएनएने स्पष्टपणे नोंदवलं आहे.

 

Protected Content