तालिबान्यांचा क्रिकेटला पाठिंबा

 

 

काबुल : वृत्तसंस्था । तालिबानने अफगाणिस्तान क्रिकेटला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केलाय.

 

तालिबानने दिलेल्या माहितीनुसार अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटची सुरुवात मागच्या वेळेस त्यांची राजवट असतानाच झाली. त्यामुळेच आम्ही या पुढेही क्रिकेटला प्रोत्साहन देत राहू असं तालिबानने म्हटलं आहे. तालिबानने अजीजुल्लाह फाजलीला अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे नवीन महानिर्देशक म्हणून नियुक्त केल्याची घोषणा केलीय.

 

तालिबानच्या राजकीय कार्यालय आणि क्रिकेट मंडळाकडून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलेल्या गटामध्ये सदस्य म्हणून अनस हक्कानी सहभागी झाले होते. हक्कानी यांनी राष्ट्रीय क्रिकेट संघाच्या सदस्यांसोबतच्या बैठकीमध्ये तालिबान्यांनी दिलेल्या आश्वासनाचा उल्लेख केला. तालिबानसोबतच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार ङसमतुल्ला शाहिदी,  क्रिकेट बोर्डाच्या निवड समितीचे माजी अध्यक्ष असदुल्ला आणि नूर अली जादरान सहभागी झाले होते.

 

तालिबानकडून या चर्चेमध्ये सहभागी झालेल्या सोहेल शाहीन यांनी क्रिकेट संघाला तालिबान समर्थन देणार असल्याचा उल्लेख केला. अफगाणिस्तान आणि पाकिस्तानदरम्यानच्या सामन्याची आम्ही वाट पाहत असल्याचंही शाहीन म्हणाले. तालिबानने या आठवड्याच्या सुरुवातीलाच काबूलमध्ये माजी कर्णधार असगर स्टानिकजई आणि राष्ट्रीय संघाचा सदस्य  नवरोज मंगलची भेट घेतली होती.

 

अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी हमीद यांनीही तालिबान अफगाणिस्तानमधील क्रिकेटला समर्थन देईल असं मत व्यक्त केलंय. “तालिबानला क्रिकेटची खूप आवड आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच आम्हाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी आमच्या कोणत्याही बाबतीत हस्तक्षेप केलेला नाही. ते क्रिकेटमध्ये कोणतेही अडथळे निर्माण करतील असं मला वाटत नाही. मला त्यांच्याकडून पूर्ण सहकार्याची अपेक्षा आहे जेणेकरून आमच्या क्रिकेटची प्रगती होत राहील. आमच्याकडे एक सक्रिय अध्यक्ष आहेत आणि मी पुढील सूचना येईपर्यंत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत राहीन,” असं हमीद म्हणालेत.

 

 

अफगाणिस्तानचा संघ आगामी मालिकांमध्ये खेळणार असल्याचं क्रिकेट बोर्डाने यापूर्वीच स्पष्ट केलं आहे. भारतात होणारा टी २० वर्ल्डकप कोरोनामुळे यूएईत स्थलांतरीत करण्यात आला आहे. २०१६ नंतर पहिल्यांदाच टी २० वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे. ही स्पर्धा १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर दरम्यान ओमान आणि यूएईत खेळली जाणार आहे. मात्र या स्पर्धेत अफगाणिस्तानचा संघ खेळणार की याबाबत शंका उपस्थित करण्यात येत होती. मात्र अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाने स्पर्धेत खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. टी २० विश्वचषक आणि ऑस्ट्रेलिया-वेस्ट इंडिजसोबत असलेल्या तिरंगी मालिकेसाठी सज्ज असल्याचं सांगितलं आहे.

 

Protected Content