दुसऱ्या लाटेत कोरोनाची लस घेणाऱ्या ८० टक्के लोकांना डेल्टा व्हेरियंटची लागण

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था ।   दुसर्‍या लाटेदरम्यान, ब्रेकथ्रू इन्फेक्शन (लसीकरणानंतर संसर्ग) संबंधित आयसीएमआरचा अभ्यास समोर आला आहे.  कोविड -१९ च्या ‘डेल्टा व्हेरिएंट’ मुळे देशातील जास्तीत जास्त लोकांना संसर्ग झाला.  दोन्ही डोस घेतल्याने रुग्णालयात दाखल करण्याची किंवा मृत्यूची शक्यता कमी झाली आहे.

 

एकूण ६७७ लोकांचा अभ्यासात समावेश करण्यात आला  जे लसीचा पहिला किंवा दुसरा डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आढळले होते. ६७७ लोकांपैकी ५९२ लोकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले होते. यापैकी ५२७ जणांनी कोव्हिशिल्ड लस घेतली होती तर ६३ जणांनी कोव्हॅक्सिन लस घेतली होती.  ८५ लोकांना लसीचा एकच डोस देण्यात आला होता. १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांतून ही माहिती गोळा करण्यात आली होती.

 

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या अभ्यासानुसार, ८६.६९ टक्के म्हणजे ४४३ लोकांना डेल्टा, अल्फा, कप्पा, डेल्टा AY.१ आणि डेल्टा AY.२ची लागण झाली होती. डेल्टा प्रकारामुळे ३८४ लोकांना संसर्ग झाला होता. दुसर्‍या लाटेत जास्तीत जास्त डेल्टा प्रकारामुळे लोकांना संसर्ग झाला. यामध्ये ९.८% लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर ०.४ टक्के म्हणजेच ३ लोक दोन्ही डोस घेतल्यानंतरही मरण पावले.

 

आयसीएमआरच्या अभ्यासानुसार असे सांगण्यात आले आहे की लसीकरणामुळे रुग्णालयात दाखल करण्याचा प्रवेश आणि मृत्यू होण्याचे प्रमाण कमी होते. उत्तर, दक्षिण, पश्चिम, पूर्व, पूर्वोत्तर आणि भारताच्या भागांमध्ये केलेल्या आरटी-पीसीआर चाचण्यांमध्ये एकूण ६७७ जणांनी चाचणी पॉझिटिव्ह आली होती. हे नमुने १७ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून घेण्यात आले. महाराष्ट्र, केरळ, गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक, मणिपूर, आसाम, जम्मू-काश्मीर, चंडीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, पांडिचेरी, नवी दिल्ली, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू यांचा यामध्ये समावेश होता.

 

त्यापैकी ४८२ जणांना एकापेक्षा अधिक लक्षणे होती. तर २९ टक्के लोकांना कोणतीही लक्षणे नव्हती तरीही ते  पॉझिटिव्ह होते.   लक्षणांमध्ये ताप (६९ टक्के) हे सर्वांमध्ये आढळून आलेले लक्षण होते. त्यानंतर अंगदुखी, डोकेदुखी आणि मळमळ (५६ टक्के) खोकला (४५ टक्के) घसा खवखवणे (३७ टक्के), वास आणि चव कमी होणे (२२ टक्के) अतिसार (६ टक्के), श्वासोच्छ्वासामध्ये अडचण (६ टक्के) आणि १ टक्के डोळ्यातील जळजळ आणि लालसरपणा यांचा समावेश होता.

 

Protected Content