उत्तरप्रदेशात पुन्हा ‘योगीराज’ : भाजपला दणदणीत बहुमत

लखनऊ-वृत्तसंस्था | बहुतांश एक्झीट पोलने दर्शविल्यानुसार उत्तरप्रदेशात पुन्हा एकदा योगी सरकार सत्तारूढ होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. समाजवादी पक्षाने बर्‍यापैकी कामगिरी केली असली तरी कॉंग्रेस, बसपासह अन्य पक्ष अक्षरश: भुईसपाट झाले आहेत.

उत्तरप्रदेशात विविध टप्प्यांमध्ये झालेल्या निवडणुकीचे निकाल आज सकाळपासून जाहीर करण्यात येत आहेत. अद्याप संपूर्ण कल समोर आले नसले तरी विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

सकाळी अकराच्या सुमारास आलेल्या कलांनुसार भारतीय जनता पक्षाला २४५ जागांवर आघाडी मिळाली असून समाजवादी पक्ष हा १११ जागांवर आघाडी मिळवून दुसर्‍या स्थानी आहे. तर कॉंग्रेस आणि बसपासह अन्य पक्षांची मात्र या निवडणुकीत दाणादाण उडाल्याचे दिसून येत आहे.

यंदाच्या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे भारतीय जनता पक्षाने टक्केवारीत पहिल्यांदाच ४०चा टप्पा पार केला असून या पक्षाला सुमारे ४२ टक्के मते मिळाली आहेत. तर समाजवादी पक्षाला ३२ टक्के मते मिळाली आहेत.

Protected Content