पुणे (वृत्तसंस्था) तुम्ही ज्याप्रमाणे कमी जागेत जास्त पीक घेतले, त्याप्रमाणे शरद पवारांसोबत आम्ही कमीत कमी आमदारांमध्ये सरकार स्थापन करण्याचा चमत्कार करुन दाखवला, असे वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४३ व्या वार्षिक सर्व साधारण सभा आणि पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, या संस्थेचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे आहे. ते तुम्हाला कमीत कमी जागेत जास्तीत जास्त उत्पादन द्यायला शिकवतात. तसेच राजकारणात पवारांनी नवीन चमत्कार केला. कमीत कमी आमदारात त्यांनी राज्यात चमत्कार केला. त्यामुळे असे म्हणू नये जागा जास्त आहे त्यामुळे आमची पिकं सगळीकडे येणार. कमीत कमी जागेत सुद्धा तुमच्यावर मात करु शकतो. ते करुनही दाखवले, असा टोला मुख्यमंत्र्यांनी भाजपला लगावला. तर आज ग्रामीण अर्थव्यवस्था शेतकऱ्यावर अवलंबून आहे. दुसऱ्याच्या आयुष्यात गोडवा वाटत असताना शेतकऱ्याच्या आयुष्याचं चिपाड होत आहे. जर आम्ही राज्यकर्त्यांनी याकडे लक्ष दिलं नाही तर या कार्यक्रमाला काही अर्थ नाही, से मुख्यमंत्री ठाकरे पुढे म्हणाले.