….. तर देश कधीच माफ करणार नाही — गेहलोत

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना मोठ्या प्रमाणात संसर्ग झाला तर देश कधीच माफ करणार नाही असं राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटलं आहे.

 

 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन आणि सरकारला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भातील इशारा दिलाय. वेळेत लसीकरण झालं नाही तर तिसरी लाट दुसऱ्या लाटेपेक्षाही भयंकर असेल, अशी भीती गेहलोत यांनी व्यक्त केलीय.

गेहलोत यांनी ट्विटवरवरुन यासंदर्भातील भाष्य केलं आहे. “१३० कोटी लोकसंख्या असणाऱ्या आपल्या देशामध्ये तातडीने सर्वांच्या लसीकरणाची सोय केली नाही आणि तिसऱ्या लाटेमध्ये मुलांना संसर्ग झाला तर ऑक्सिजन आणि औषधांच्या कमतरतेमुळे दुसऱ्या लाटेमध्ये जी परिस्थिती निर्माण झाली त्यापेक्षा जास्त गंभीर परिस्थिती निर्माण होईल. तिसऱ्या लाटेमध्ये संसर्गाचं प्रमाण वाढलं तर आपण लहान मुलांना वाचवू शकणार नाही,” असं गेहलोत यांनी ट्विट केलं आहे.

पुढच्या ट्विटमध्ये त्यांनी पंतप्रधान मोदी आणि आरोग्यमंत्र्यांना टॅग केलं आहे. “मोदीजी आणि हर्ष वर्धनजी लसींच्या उत्पापदनाला सर्वोच्च प्राधान्य देणं गरजेचे होतं. यासाठी गरज पडल्यास कायद्यात बदल करुन इतर कंपन्यांनाही लसींच्या निर्मितीसंदर्भातील परवानगी देऊन प्रोत्साहन द्यायला हवं होतं. भारत हा जगभरामध्ये लस निर्मितीसाठी आघाडीचा देश मानला जातो,” असं गेहलोत यांनी म्हटलं आहे.

आपल्या तिसऱ्या ट्विटमध्ये केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आकडेवारी सोडून राज्यांना जास्त प्रमाणात लसी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात यावा अशी मागणी गेहलोत यांनी केलीय.

 

 

तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त केली जात असल्याने टास्क फोर्स निर्माण करुन त्यासंदर्भातील उपाययोजनांचे काम केंद्रीय आणि वेगवेगळ्या राज्यांमधील सरकारांनी राज्य स्तरावर सुरु केलं आहे.

 

Protected Content