जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तरूणाच्या धमकीतून होत असलेल्या मानिसिक त्रासाला कंटाळून जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या २० वर्षीय तरूणीने राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती. तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणाऱ्या तरूणाविरोधात रविवारी १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात २० वर्षीय तरूणी ही आपल्या परिसारात वास्तव्याला होती. त्याच परिसरात राहणारा अक्षय रामचंद्र सुरवाडे याच्यासोबत तरूणीचे प्रेमसंबंध होते. परंतू अक्षयला व्यसन होते शिवाय काहीही कामधंदा करत नव्हता. त्यामुळे तरूणीच्या नातेवाईकांनी तिची समजूत काढून अक्षयशी संबंध तोडून दे, असे सांगितले. त्यानंतर तरूणीने अक्षयशी बोलणे बंद करून त्याचा मोबाईल नंबर ब्लॅक लिस्टमध्ये टाकून दिला होता. त्यानंतर अक्षय हा तिच्या घरी येवून “माझ्याशी प्रेमसंबंध ठेवावे लागेल, नाहीतर मी आत्महत्या करून तुझ्यासह तुझ्या परिवाराला संपवून टाकेल” अशी धमकी दिली होती. यासंदर्भात तरूणीने रामानंदनगर पोलीस ठाण्यात अक्षय विरोधात तक्रार दिली होती. तरी देखील अक्षय हा तिचा पाठलाग करून तिला मानसिक त्रास देत होता. अक्षय याच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून तरूणीने ११ मार्च रोजी सकाळी ११ वाजता राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केली होती. त्यानंतर तिच्यावर अंत्यविधी व इतर कार्यक्रम आटोपल्यानंतर मयत तरूणीच्या आईने रविवारी १९ मार्च रोजी दुपारी ३ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात अक्षय विरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी अक्षय रामचंद्र सुरवाडे याच्या विरोधात तरूणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंदनगर ठाण्याचे पोलीस कर्मचारी करीत आहे.