जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोलाणी मार्केट येथील दुकानात माल ठेवण्यासाठी आलेल्या कॉम्प्युटर रिपेअरिंग व्यावसायिक तीन जणांनी मारहाण करुन त्याच्याकडील लॅपटॉप, बॅग तसेच इतर साहित्य असा एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शुक्रवार, २४ मार्च रोजी सायंकाळी पावणे पाच वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील नवीपेठ येथे कैजाद नवरोज जलगाव वाला वय ३६ हे वास्तव्यास आहेत. त्यांचा कॉम्प्युटर रिपेअरिंगचा व्यवसाय आहे. या व्यवसायासाठी आवश्यक माल एमआयडीसीतून घेवून तो ठेवण्यासाठी कैजाद हे गुरुवारी रात्री साडेअकरा वाजेचा सुमारास गोलाणी मार्केट येथे आले, याठिकाणी अनोळखी तीन जणांनी कैजाद यांना मारहाण करुन त्याच्याकडील लॅपटॉप, बॅग, मोबाईल, २ हार्डडिस्क व ४ रॅम असा एकूण ५३ हजारांचा मुद्देमाल तीघांनी बळजबरीने घेवून पळून गेले, याबाबत कैजाद जलगाववाला यांनी दुसऱ्या दिवशी शुक्रवारी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली, या तक्रारीवरुन अनोळखी तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भांडारकर हे करीत आहेत.