चाळीसगाव, प्रतिनिधी । येथील हृदयरोग तज्ञ डॉ. शैलेश अजयसिंग राऊळ यांच्या संकल्पनेतून व सामाजिक कार्यकर्ते न. पा.च्या आरोग्य सभापती सायली जाधव यांचे पती रोशन जाधव व नायब तहसीलदार प्रवीण मोरे यांच्या प्रयत्नातून डॉक्टर राऊळ यांनी चाळीसगाव तालुका परिसरातील पोलीस व पत्रकारांच्या आरोग्याची संपूर्णपणे मोफत तपासणी करून त्यांना आरोग्यविषयक सल्ला दिला.
सध्या देशभर थैमान घालत असलेल्या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पोलीस बांधव व पत्रकार सतत कार्यरत असल्याने त्यांच्यामध्ये ताण-तणाव येऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत त्यांना आरोग्याची तपासणी होऊन योग्य सल्ला देणे गरजेचे असल्याने त्यांनी हा उपक्रम घेतला आहे. यात दिनांक १८ व १९ अशा दोन दिवस जवळपास शंभरपेक्षा अधिक पोलीस, पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असून पोलीस आणि पत्रकारांनी डॉक्टर राऊळ व आयोजक सामाजिक कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले आहेत. या उपक्रमास अजय प्रतापसिंह पाटील, सायली जाधव, रोशन जाधव, तहसील कार्यालयाचे प्रवीण मोरे. पत्रकार मुराद पटेल, गौतम जाधव, बबलू जाधव, अभय राजपूत, किरण महाजन, शरद मोरे, किरण मोरे, लंकेश शर्मा, अक्षय जाधव, सना खान यांचे सहकार्य लाभले.