नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | निवडणूक आयोगाच्या निकालास स्थगिती मिळावी म्हणून ठाकरे गटाने दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
शिवसेना हे पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. ही याचिका आज दाखल करून घेण्यात आली. उद्या दुपारी साडेतीन वाजता या याचिकेवर सुनावणी घेण्यात येईल असे सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांच्यावतीने ही याचिका दाखल करण्यात आली आहे. शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा निकालात निघेपर्यंत निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाला स्थगिती दिली जावी, असा पवित्रा ठाकरे गटाने घेतला आहे.
ठाकरे गटाकडून सोमवारी याचिका देण्यात आली होती. पण ती काल दाखल करुन घेण्यात आली नव्हती. कालच्या लिस्टेड मेन्शनिंगमध्ये ठाकरे गटाच्या याचिकेचा समावेश नव्हता. न्यायालयाने याबाबत ठाकरे गटाला मंगळवारी पुन्हा याचिका मेन्शन करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार ती आज मेन्शन करण्यात आली. यावर उद्या सुनावणी होणार असून यामध्ये नेमका कसा युक्तीवाद होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.