ट्रम्प यांनी संरक्षणमंत्र्यांना हटवले

वॉशिंग्टन: वृत्तसंस्था । अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांची हकालपट्टी केली आहे.

एस्पर यांच्या जागी राष्ट्रीय दहशतवादविरोधी केंद्राचे संचालक ख्रिस्तोफर मिलर यांची नेमणूक करण्यात आली आहे. ट्रम्प यांच्या सत्तेचा कार्यकाळ संपण्यासाठी फक्त ७२ दिवस उरले आहेत. त्यामुळे ट्रम्प यांच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

अमेरिकन माध्यमांमध्ये संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांना संरक्षण मंत्रीपदावरून हटवण्यात येणार असल्याची चर्चा आधीपासूनच सुरू होती. मात्र, राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर डोनाल्ड ट्रम्प एवढा मोठा निर्णय घेतील याची खात्री कोणालाही नव्हती. ट्रम्प आणि एस्पर यांच्यात अनेक मुद्यांवर मतभेद असल्याचीही चर्चा होती.

मे महिन्यात कृष्णवर्णीय व्यक्ती जॉर्ज फ्लाइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये वर्णद्वेषविरोधात आंदोलन पेटले. या आंदोलनाला हिंसक वळणही लागले. पोलीस ठाण्यांसह, शासकीय इमारतींची नासधूस करण्यात आली होती. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांनी संरक्षण मंत्री एस्पर यांना शहरांमध्ये सैन्याची नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. मात्र, त्यास त्यांनी नकार दिला होता.

एस्पर यांनाही आपल्याला पदावरून दूर करण्यात येईल असा अंदाज होता. त्यामुळेच त्यांनी काही आठवड्यांपूर्वीच एरिजोनामध्ये आपले राजीनामा पत्र तयार ठेवले होते. ट्रम्प यांच्या कार्यकाळातील मागील दोन वर्षात चौथ्यांदा अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाची जबाबदारी कार्यवाहक संरक्षण मंत्र्याकडे सोपवण्यात आली.

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर अमेरिकेत आता सत्ता हस्तांतराच्या मुद्द्यावरून वाद रंगला आहे. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने सरकारच्या चाव्या निवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांच्या हस्तांतरणाच्या टीमकडे जानेवारी २०२१ पर्यंत देण्यास नकार दिला आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सतत त्यांच्यावर निवडणुकीत फेरफार केल्याचा आरोप करत आहेत. दुसरीकडे, रिपब्लिकन पक्षातील मतभेद आणखी तीव्र होत आहेत.

Protected Content