मुंबई पालिकेच्या तरण तलावात क्लोरीन वायूची गळती; आठ जण रूग्णालयात

hospital clipart pictures 3

मुंबई वृत्तसंस्था । महापालिकेच्या मुलुंड येथील क्रीडा संकुलातील तरण तलावात क्लोरिन वायूची गळती झाली. अग्निशमन दलाच्या महिला कर्मचाऱ्यासह आठ जणांना बाधा झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मुलुंड येथे महापालिकेचे प्रियदर्शनी क्रीडा संकुल आहे. या संकुलातील तरण तलावात बुधवारी संध्याकाळी क्लोरिन वायूची गळती झाली. तरण तलावाच्या शुद्धीकरण प्रकल्पाच्या इमारतीच्या तळमजल्यावर क्लोरिन गॅसचे सिलिंडर ठेवले होते. त्यातून अचानक गळती सुरू झाली. क्लोरिन गॅस सर्वत्र पसरण्यास सुरुवात झाली. याबाबत सूचना मिळाल्यानंतर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी गॅसची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला. काही अग्निशमन कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकांना गॅसमुळं गुदमरल्यासारखे झाले. अस्वस्थ वाटू लागल्यानं त्यांना तातडीने जवळच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी पी. एस. रहांगदळे यांनी दिली.

अग्निशमन कर्मचारी नोहिन शेख यांच्यासह इतर सुरक्षा कर्मचारी अशा आठ जणांना या गॅस गळतीची बाधा झाली. या दुर्घटनेचे पडसाद पालिकेच्या सभेतही उमटले. पूर्व उपनगरांतील बहुतांश नागरिक या तरण तलावाचा वापर करतात. पालिका प्रशासनाने तातडीने देखभाल आणि दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेना नगरसेविका विशाखा राऊत यांनी केली. स्थानिक नगरसेविका समिता कांबळे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली होती. तरण तलाव परिसरात संध्याकाळच्या वेळेस मोठ्या संख्येने मुले आणि महिला येत असतात.

Protected Content