आता मालवाहतुकीचेही खाजगीकरण ; रेल्वेचा विचार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आता सरकार आणि रेल्वे मंत्रालय खासगी मालगाड्याही सादर करण्याचा गांभीर्याने विचार करीत आहे. या खासगी मालगाड्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर अर्थात डीएफसीवर चालवण्यात येणार आहेत. मालगाड्यांमध्ये सर्वच वस्तूंची वाहतूक करण्यात येणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने देशातील जवळपास २८०० किलोमीटरचा डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर २०२२पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. या दोन्ही कॉरिडॉरवरून अधिकाधिक सामानाची वाहतूक करणाऱ्या मालगाड्या चालविण्याचा सरकारचा विचार आहे. दोन मजली कंटेनर ट्रेनही चालविण्यात येणार आहे. याच मार्गांवरून खासगी मालगाडीही चालविण्यात येण्याची शक्यता आहे.

स्टील, लोखंड, वस्त्रोद्योग आणि वाहन उद्योगाशी संबंधित उद्योगपतींना आकर्षित करण्यासाठी विशेष नीती राबविण्यात येणार आहे. उद्योगपतींनी आपापली मालगाडी खरेदी केल्यास त्यांना कच्चा माल आणि अन्य वस्तूंची वाहतूक करणे स्वस्तात पडण्याची शक्यता आहे. स्वत:ची मालगाडी खरेदी करणाऱ्या उद्योगपतींमध्ये टाटा, अदानी, महिंद्र आणि मारुती उद्योगसमूहाचा समावेश असण्याची शक्यता आहे.

खासगी मालगाड्या चालविण्यासाठी आवश्यक डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरची निर्मिती टप्प्याटप्प्याने करण्यात येत आहे. सध्या काही ठिकाणी काम सुरू असून, काही ठिकाणी ते संपण्याच्या मार्गावर आहे. मार्च २०२२पर्यंत एकूण २८०० किलोमीटरचे डीएफसी मार्ग उभारण्याची रेल्वे मंत्रालयाची योजना आहे.

सध्या रेल्वे मंत्रालयाने खासगी क्षेत्राला मालगाड्या चालविण्याची परवानगी दिली असली, तरी ही सुविधा कंटेनर ट्रेनपर्यंतच मर्यादित आहे. मोठमोठ्या कंटेनरची वाहतूक करणाऱ्या गाडीला कंटेनर ट्रेन असे म्हणतात. त्यांमधून मर्यादित प्रमाणात वस्तूंची वाहतूक केली जाते. रेल्वे मंत्रालयाच्या मते खासगी कंटेनर ऑपरेटरना सर्व प्रकारच्या वस्तूंच्या वाहतुकीची परवानही दिल्यास ते रेल्वेशी वाहतुकीची स्पर्धा करण्याची शक्यता आहे.

रेल्वे मंत्रालयाने दीर्घकालीन करार केले तर, अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स क्षेत्रातील कंपन्या खासगी मालगाड्यांची सेवा देण्यासाठी पुढे येऊ शकतात. सध्या रेल्वेमध्ये कंटेनर ट्रेनच चालवल्या जातात. मात्र, या गाड्या केवळ स्टील आणि दगडी कोळशाच्या वाहतुकीपुरत्याच मर्यादित आहेत. या प्रकारच्या मालगाड्यांचे प्रमाणही अतिशय अल्प आहे. त्यामुळे खासगी कंपन्या आणि उद्योगपतींना पुढे येण्याचे आवाहन करण्यात येण्याची शक्यता आहे.

Protected Content