Home उद्योग भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात कामगारांचा एल्गार ; बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात कामगारांचा एल्गार ; बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

0
8


दीपनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथील औष्णिक विद्युत केंद्रातील कंत्राटी कामगारांवरील कथित अन्याय, प्रलंबित मागण्या आणि एसपी इंटरप्राईजेस कंपनीच्या चौकशीसंदर्भातील विलंबामुळे कामगारांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. निळे निशाण कामगार संघाच्या वतीने मुख्य अभियंत्यांना निवेदन देत ६ जून रोजी ‘टूल डाऊन’ आंदोलन आणि ७ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

निळे निशाण कामगार संघाच्या निवेदनानुसार, भुसावळ औष्णिक विद्युत केंद्रात कार्यरत असलेल्या एसपी इंटरप्राईजेस कंपनीविरोधात भ्रष्टाचार आणि कामगारांच्या हक्कांशी संबंधित गंभीर तक्रारी करण्यात आल्या होत्या. या प्रकरणाची चौकशी करून कामगारांना न्याय देण्याबाबत मुख्य अभियंत्यांनी ८ मे २०२६ रोजी लेखी आश्वासन दिले होते. तसेच चौकशी पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांची मुदतही मागितली होती. मात्र, मुदत संपूनही चौकशी अहवाल जाहीर करण्यात आलेला नसल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

संघटनेच्या म्हणण्यानुसार, कामगारांच्या विविध मागण्या अद्याप पूर्ण झालेल्या नाहीत. संबंधित कंपनी आणि कंत्राटदार यांना काही अधिकाऱ्यांचे संरक्षण मिळत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. याशिवाय आंदोलनात सहभागी असलेल्या कामगारांना आणि त्यांच्या कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचा गंभीर आरोप संघटनेने केला आहे.

दि. ३ जूनपासून सुरू असलेल्या उपोषणाकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही संघटनेकडून करण्यात आला आहे. कामगारांच्या न्याय्य मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने आंदोलनाची तीव्रता वाढविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याच पार्श्वभूमीवर निळे निशाण कामगार संघाने ६ जून रोजी संविधानिक मार्गाने ‘टूल डाऊन’ आंदोलन छेडण्याची घोषणा केली आहे. त्यानंतरही मागण्यांवर सकारात्मक निर्णय न झाल्यास ७ जूनपासून पूर्ण कामबंद आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीस एसपी इंटरप्राईजेस कंपनी आणि दीपनगर प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही देण्यात आला आहे.

संघटनेचे भुसावळ तालुका कामगार अध्यक्ष आकाश सपकाळे यांनी दिलेल्या निवेदनात, कामगारांच्या जीवितास धोका असल्याबाबत यापूर्वीही शासन व प्रशासनाला अवगत करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. उपोषणकर्ते आणि संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर, पदाधिकारी व कामगारांच्या सुरक्षिततेची जबाबदारी संबंधित कंपनी, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर राहील, असेही त्यांनी नमूद केले आहे.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस, महा निर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, कामगार आयुक्त, प्रांताधिकारी, तहसीलदार तसेच महा निर्मितीच्या विविध विभागीय अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.


Protected Content

Play sound