ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । एमआयडीसी कंपनीत दुचाकीने कामावर जात असतांना ट्रकच्या जोरदार धडकेत ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी उमाळे फाट्यानजीक घडली. ट्रकसह चालकास अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, डिगंबर सोनू नेमाडे (वय-६५, रा. गजानन नगर, काशिनाथ लॉजजवळ) हे एमआयडीसीतील भाग्यश्री प्लास्टिक कंपनीत कामाला आहे. नेहमीप्रमाणे आज सकाळी ८ वाजेच्या सुमारास कंपनीत कामाला जात असतांना चिंचोली-उमाळे गावादरम्यान राधाकृष्ण लॉन जवळ समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले. त्याच वेळी त्याच्या ओळखीचे मित्र भगावान सुकलाल निकम हे दुकानावर जात असतांना त्यांनी ओळखले. त्यांनी तातडीने जखमी डिगंबर नेमाडे यांनी शहरातील खासगी रूग्णालयात दाखल केले. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गुलाबराव देवकर वैद्यकिय महाविद्यालयात रवाना केले. वैद्यकिय अधिकारी डॉ. सचिन अहिरे यांनी मयत घोषीत केले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. एमआयडीसी पोलीसांनी ट्रक ताब्यात घेतले असून चालकास अटक करण्यात आली आहे. प्राथमिक तपास सपोनि संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पो.कॉ. संतोष पवार, संदीप धनगर करीत आहे.

डिगंबर नेमाडे हे जळगावात एकटे राहत होते. १ वर्षापुर्वी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांच्या पश्चात गिरीष आणि मनोज हे दोन मुले असून दोन्ही नोकरीच्या निमित्ताने नाशिक आणि पुणे येथे स्थायिक झाले आहेत.

Protected Content