श्रीनगर : वृत्तसंस्था । आता हिजबुलने डेहराडून कॉलेजमध्ये शिकणारा आणि एम.फीलचं शिक्षण अर्धवट सोडून दहशतवादी बनलेल्या झुबैर वानीला काश्मीरमध्ये आपला कमांडर बनवलं आहे.
जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतर भारतीय सुरक्षा रक्षकांनी दहशतवादी गटांविरोधात कारवाईचा वेग वाढवला आहे. गेल्या सहा महिन्यात सैन्यानं दोन मोठ्या चकमकींमध्ये हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचे दोन कमांडर ठार केले.
३१ वर्षीय वानी २०१८ मध्ये हिज्बुलमध्ये सहभागी झाला होता. त्याचं कुटुंब काश्मीरच्या अनंतनाग जिह्याच्या देहरुना गावात राहतं. वानी आपल्या कुटुंबात एकटाच शिकलेला व्यक्ती असून तो उत्तराखंडमधील शिक्षण सोडून दहशतवादी संघटनेत सामिल झाला.
सुरक्षा रक्षकांनी गेल्या रविवारी हिजबुलचा कमांडर सैफुल्लाह मीर याला ठार केलं होतं. यापूर्वी मे महिन्यांत या दहशतवादी संघटनेचा प्रमुख रियाज नाइकू यालाही ठार करण्यात आलं होतं. भारतीय जवानांच्या या दोन मोठ्या कारवायांनंतर हिजबुलने आपला सर्वात जुना दहशतवादी अशरफ मौलवी ऊर्फ अशरफ खान याच्या जागी वानीला संघटनेचा म्होरक्या बनवला.
मौलवी सध्या किडनीच्या आजाराने त्रस्त असून त्याने यापूर्वी अनेकदा दहशतवाद सोडण्याबाबत सूचक विधानं केली आहेत. रियाज नाइकू मारला गेल्यानंतर सुरक्षा रक्षकांच्या यादीत A++ श्रेणीच्या दहशतवादी मौलवीला हिज्बुलचा कमांडर बनवण्याची चर्चा होती. पण तोवर किडनीच्या समस्येमुळं सैफुल्लाह मीरकडे ही जबाबदारी सोपवण्यात आली होती.
सुरक्षा रक्षकांनी काश्मीर खोऱ्यात सातत्याने दहशतवादाविरोधात ऑपरेशन सुरु केलं आहे. यामुळे एकीकडे दहशतवादी संघटनांमध्ये सहभागी झालेल्या तरुणांचे घरी परतणे सुरु झाले आहे. तर दुसरीकडे अनेक दहशतवाद्यांना एन्काउंटरमध्ये ठार करण्यात आलं आहे.